Shashank Ketkar Slammed Producer For Unpaid Payment: मराठी अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर नेहमीच स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडताना दिसतो. सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर मत व्यक्त करणारा शशांक यावेळी मात्र वैयक्तिक अनुभवामुळे चांगलाच संतप्त झाला आहे. एका मालिकेच्या निर्मात्याकडून आपलं मानधन थकवण्यात आलं असल्याचा आरोप करत शशांकने थेट पोस्ट शेअर करत इशाराही दिला आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्याने कोणाचंही नाव घेतलेलं नाही.
‘होणार सून मी ह्या घरची’, ‘मुरांबा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला शशांक केतकर सध्या चर्चेत आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या सोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. शशांकच्या म्हणण्यानुसार, एका मालिकेसाठी काम करूनही त्याचं मानधन आजतागायत मिळालेलं नाही.
शशांक केतकर म्हणाला,
“५ वर्ष होऊन गेली आहेत. मागची पाच वर्षं आणि ८ ऑक्टोबर २०२५ पासून पुन्हा संपर्क झाल्यानंतर दिलेली एकही तारीख त्या निर्मात्याने पाळलेली नाही. थोडक्यात काय, या निगरगट्ट आणि कोडग्या निर्मात्याच्या थापांचा आता प्रचंड कंटाळा आला आहे. उद्याची, म्हणजेच ५ जानेवारी २०२६ ही आणखी एक तारीख दिली आहे. पूर्ण पेमेंट जमा झालं नाही, तर सगळ्या कुंडलीसकट एक डिटेल व्हिडीओ करेन. आणि पेमेंट झालं तर त्याचाही व्हिडीओ पोस्ट करेन.”

Shashank Ketkar Slammed Producer For Unpaid Payment
शशांकच्या या पोस्टमधून त्याचा संताप स्पष्टपणे जाणवतो. ही पोस्ट नेमकी कुणासाठी आहे, याची चर्चा त्याच्या चाहत्यांसह मराठी टेलिव्हिजन विश्वातही सुरू झाली आहे. नाव न घेतलं असलं तरी नेटकरी वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. अशातच शशांक यावर सविस्तर व्हिडीओ पोस्ट करतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
शशांक केतकरचा रोख मंदार देवस्थळींकडे?
शशांक केतकरने पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही, ना कोणत्या मालिकेचा उल्लेख केला आहे. मात्र, त्याचा रोख निर्माता-दिग्दर्शक मंदार देवस्थळींकडे असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यामागचं कारण म्हणजे ‘सुखांच्या सरींनी… हे मन बावरे’ (२०१८–२०२०) ही मालिका. या मालिकेनंतर मंदार देवस्थळी यांनी कलाकारांचं मानधन थकवल्याचे आरोप झाले होते.
या मालिकेत शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस मुख्य भूमिकेत होते. त्या वेळीही अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निर्मात्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शशांकच्या लेटेस्ट पोस्टचा रोख याच निर्मात्याकडे असावा, असा अंदाज आता लावला जात आहे.