मराठी रंगभूमीवर एक मजेदार, मनाला भिडणारं आणि नात्यांचे धागे उलगडणारं नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. वडिल-मुलीच्या गुंतागुंतीच्या नात्याला, वर्षानुवर्षे साठलेल्या कटुतेला आणि अचानक एका अनोळखी व्यक्तीच्या आगमनाने बदलणाऱ्या नात्यांच्या समीकरणांना हे नाटक नव्या दृष्टिकोनातून मांडतं. वडिल-मुलीच्या आयुष्यात तिसऱ्याचा प्रवेश नेमका कोणता वळण आणतो? त्याच्या आगमनामागे दडलेलं गूढ काय? याची उत्तरं प्रेक्षकांना रंगमंचावरच मिळणार आहेत.
या नाटकाची खासियत म्हणजे—पहिल्यांदाच भरत जाधव आणि महेश मांजरेकर हे दोघे प्रभावी कलाकार एकत्र रंगभूमीवर उभे राहणार आहेत. त्यातही महेश मांजरेकर तब्बल २९ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा क्षण जसा खास, तसाच प्रेक्षकांसाठीही अत्यंत भावनिक आहे.
दिग्दर्शक सुरज पारसनीस सांगतात, “हे नाटक फक्त हसवणारं नाही, तर नात्यांमधल्या न बोलल्या जाणाऱ्या धाग्यांना स्पर्श करणारं आहे. मैत्री आणि वडील-मुलीच्या नात्याची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.”

निर्माते आणि अभिनेते भरत जाधव म्हणतात, “महेशजींसोबत माझी अनेक वर्षांची मैत्री आहे. त्यांच्या दिग्दर्शनात मी अनेक चित्रपट केले आहेत. एकमेकांसोबत काम करताना काय अपेक्षित असतं, हे आम्ही दोघेही चांगलं जाणतो. आता आम्ही रंगमंचावर एकत्र येतोय, त्यामुळे प्रेक्षकांइतकीच आमची उत्सुकताही वाढली आहे. आमची जुगलबंदी रंगभूमीवर काहीतरी वेगळं जादुई निर्माण करेल, याची मला पूर्ण खात्री आहे.”
महेश मांजरेकर या पुनरागमनाबद्दल म्हणतात, “२९ वर्षांनंतर रंगभूमीवर परत येणं माझ्यासाठी अतिशय भावनिक आहे. नाटक नेहमी माझ्या हृदयाच्या अगदी जवळ होतं. चित्रपटांमुळे थोडा तुटलो होतो, पण आता मी पुन्हा शक्य तेवढा वेळ रंगभूमीसाठी देणार आहे. ‘शंकर जयकिशन’चं कथानक वाचताना मला जाणवलं—हे नाटक रंगमंचावर यायलाच हवं. भरतसोबत माझी उत्तम जुळवून घेणारी केमिस्ट्री आहे. तो प्रामाणिक, संवेदनशील आणि ऊर्जा असलेला कलाकार आहे. रंगमंचावर आमचा अनुभव एक वेगळाच रंग निर्माण करेल.”
भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित, सुरज पारसनीस दिग्दर्शित आणि विराजस कुलकर्णी लिखित या नाटकाला क्षितिज पटवर्धन यांची गीतांची साथ लाभली आहे. शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेलं हे विनोद, भावना आणि नात्यांची जादू मिसळलेलं नाटक १९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात प्रीमिअर होणार आहे.