अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांनी उभारलेल्या देवराई प्रकल्पाला (Devarai Project) भीषण आग (Fire) लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील पालवण परिसरात घडली असून, अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकी आग कशामुळे लागली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सयाजी शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी पालवणजवळील ओसाड डोंगररांग हिरवागार करण्याचा ध्यास घेत देवराई प्रकल्प उभारला होता. मात्र, आज सायंकाळच्या सुमारास या डोंगररांगेत अचानक धुराचे लोट दिसू लागले आणि काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग झपाट्याने पसरत संपूर्ण देवराई प्रकल्पाला वेढा बसला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या आगीत डोंगरावरील हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती तसेच अनेक पशू-पक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वर्षानुवर्षांच्या अथक परिश्रमातून उभ्या राहिलेल्या या देवराईवर आगीमुळे अक्षरशः पाणी फेरल्याचं चित्र आहे.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, उन्हाळ्याचा काळ, कोरडे गवत आणि वाऱ्याचा वेग यामुळे आग विझवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
विशेष म्हणजे, या ओसाड डोंगराला हिरवागार करण्यासाठी सयाजी शिंदे यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. कडक उन्हाळ्यातही पाण्याचे टँकर लावून झाडे जगवली गेली होती. या देवराईत अनेक दुर्मिळ भारतीय वृक्षांची लागवड करण्यात आली होती. परिणामी, या परिसरात विविध पक्षी, प्राणी आणि सरपटणाऱ्या जीवांचा वावर लक्षणीयरीत्या वाढला होता. मात्र, आजची ही आग पर्यावरणप्रेमींसाठी आणि सयाजी शिंदेंच्या प्रयत्नांसाठी मोठा धक्का मानली जात आहे.