“तुला जपणार आहे” या मालिकेत अंबिकाच्या भूमिकेतून मी एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. जसं तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलं असेल, अंबिका हयात नसतानाही आपल्या मुलीच्या रक्षणासाठी परत येते. तिचा भूतकाळ पाहिला तर ती अनाथाश्रमात वाढलेली असते. पुढे जाऊन एका प्रतिष्ठित घराण्यात तिचं लग्न होतं आणि तिचं सुखी संसाराला सुरुवात होते. मात्र, तिच्या आनंदाला कोणाचीतरी नजर लागते आणि तिच्यावर एक दुर्दैवी घटना घडते, ज्यामुळे ती या जगातून निघून जाते. परंतु, आई म्हणून तिच्या मुलीची सतत काळजी वाटत राहते आणि तिच्या रक्षणासाठी ती पुन्हा येते. ही कथा एका आईच्या मातृत्वाची, प्रेमाची आणि तिच्या मुलीच्या सुरक्षेची आहे. मालिकेची संकल्पना इतरांपेक्षा वेगळी असून, भूताची भूमिका साकारण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. ही भूमिका साकारताना नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत.”
अंबिकाच्या भूमिकेसाठी प्रतीक्षाने रीतसर ऑडिशन दिली होती. “मला आयरिस प्रॉडक्शनकडून कॉल आला होता. मी दिलेली ऑडिशन प्रॉडक्शन आणि चॅनेलला आवडली आणि त्यामुळे माझी निवड झाली. झी मराठीसोबत ही माझी पहिलीच मालिका आहे, आणि अशा मोठ्या वाहिनीवर काम करण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे. माझ्या घरच्यांनाही याचा अभिमान वाटतो. मात्र, मालिकेत अंबिकाचं निधन होतं आणि तिच्या फोटोला हार घातला जातो. हे पाहून घरचे कसे रिअॅक्ट होतील, याची मला थोडी चिंता वाटत होती. पण त्यांनी प्रोमो पाहिल्यावर उलट मला सांभाळून घेतलं!”
प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल ती म्हणते, “प्रोमो पाहून प्रेक्षकांकडून अप्रतिम प्रतिक्रिया मिळत आहेत, त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. मालिकेत जेष्ठ कलाकार पूर्णिमा तळवलकर, शर्वरी लोहोकरे आणि मिलिंद फाटक यांच्यासारखे दिग्गज आहेत. पण त्यांनी सुरुवातीपासूनच खूप सहज आणि दिलखुलास वागणूक दिली, त्यामुळे आम्हालाही त्यांच्यासोबत काम करताना दडपण जाणवलं नाही. ही सहजता प्रेक्षकांना मालिकेतही जाणवेल.”
अंबिकाच्या लुकबद्दल बोलताना ती म्हणते, “अंबिका जरी भूत असली तरी तिचा लुक साधा आहे. आमच्या कॉस्ट्यूम डिझायनर संपदा महाडिक यांनी हे लक्षात ठेवूनच तिच्या लुकची निर्मिती केली आहे. साडीतील हा लुक ट्रेंडमध्ये येऊ शकतो असं मला वाटतं!”
प्रतीक्षाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकातून केली होती. “त्यानंतर दोन मालिकांमध्ये काम केलं, आणि ही माझी तिसरी मालिका आहे. प्रशांत दामले यांच्या T-School मध्ये मी अभिनय शिकले, आणि तिथूनच कलाकार म्हणून घडत गेले.”
शेवटी ती प्रेक्षकांना एकच सांगते, “ही केवळ आई-मुलीच्या नात्याची कथा नाही, तर वेगळ्या धाटणीने मांडलेली गोष्ट आहे. तुमच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर करत राहा, आणि मालिकेला भरभरून प्रेम द्या! ‘तुला जपणार आहे’ सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता, फक्त झी मराठीवर!”