Home » ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’मुळे अस्मिता गादेकरच्या स्वप्नांना नवी भरारी

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’मुळे अस्मिता गादेकरच्या स्वप्नांना नवी भरारी

स्टार प्रवाहच्या लोकप्रिय गायन रिअ‍ॅलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ च्या चौथ्या पर्वालाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांनी आणि टॅलेण्टने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करत आहेत. ‘मी होणार सुपरस्टार’चा मंच ही केवळ स्पर्धा नसून, छोट्या कलाकारांच्या स्वप्नांना दिशा देणारा आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणारा हक्काचा मंच आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

या पर्वातील स्पर्धक अस्मिता गादेकरच्या प्रवासाने अनेकांची मनं जिंकली आहेत. नाशिकच्या अस्मिताने काही दिवसांपूर्वीच आपल्या वडिलांचं छत्र गमावलं. अस्मिता आणि तिच्या दोन बहिणींची स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी तिची आई दिवसरात्र मेहनत घेत आहे. आपल्या मुलीने नाव कमवावं, स्वतःची ओळख निर्माण करावी, हे स्वप्न उराशी बाळगून अस्मिताच्या आईने तिला ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या मंचावर आपलं टॅलेण्ट सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

याआधीच्या पर्वातही अस्मिताने सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र चौथ्या पर्वात खऱ्या अर्थाने तिला सूर गवसला आणि तिची निवड झाली. अल्पावधीतच अस्मिताने आपल्या गाण्याने परीक्षकांसह प्रेक्षकांचीही मनं जिंकली. नुकतंच सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलेलं एक भीमगीत अस्मिताने सादर केलं. तिच्या या सादरीकरणाला तिन्ही परीक्षकांकडून भरभरून कौतुक मिळालं.

अस्मिताची गाण्यातील चमक आणि तिची जिद्द पाहून स्टार प्रवाह वाहिनी आणि ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या टीमने तिच्या शालेय शिक्षणाचा खर्च आणि सांगितीक वाटचालीसाठी आवश्यक मदत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

यावेळी बोलताना सुप्रसिद्ध गायक आणि शोचे परीक्षक आदर्श शिंदे म्हणाले,

“मी तिच्या वयाचा असताना हे गाणं रेकॉर्ड केलं होतं, पण अस्मिताने ते माझ्यापेक्षा सुंदर गायले. इतक्या समजूतदारपणे तिने हे गाणं सादर केलं, याचा मला खूप अभिमान आहे. माझ्या पुढील कार्यक्रमांमध्ये अस्मिताने गाणं सादर करावं, अशी माझी इच्छा आहे. ‘छोटे उस्ताद’ची मुलं मला प्रेमाने आदर्श दादा म्हणतात. दादा या नात्याने मी सांगू इच्छितो की अस्मिताच्या नववीच्या शिक्षणाचा खर्च स्टार प्रवाह वाहिनी आणि छोटे उस्तादची टीम करणार आहे. इतकंच नाही, तर तिच्या सांगितीक वाटचालीत कुठलंही वाद्य लागलं, तर तिने ते हक्काने माझ्याकडे मागावं.”

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ ही केवळ स्पर्धा नसून एक कुटुंब आहे. या कुटुंबाचा भाग असल्याचा अभिमान प्रत्येकालाच आहे. सुरांची ही मैफल अनुभवण्यासाठी नक्की पाहा — दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy