मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलाय. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजाराशी झुंज देत असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्यावर मातृशोक कोसळलाय. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
ज्योती चांदेकर यांनी छोट्या पडद्यापासून रंगभूमी आणि मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यांनी ‘ठरलं तर मग’ ही स्टार प्रवाहवरील मालिका शेवटची केली होती. त्याआधी त्यांनी ‘मी सिंधुताई सपकाळ’ (2010) या चित्रपटात केलेली सिंधुताईंची भूमिका विशेष गाजली. तसेच ‘गुरु’ (2016) आणि ‘देवा एक अतरंगी’ (2017) यांसारख्या चित्रपटांतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
त्यांची कारकीर्द पाच दशकांहून अधिक काळ पसरलेली होती. केवळ बारा वर्षांच्या वयात अभिनयाची सुरुवात करून त्यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. गुरू, ढोलकी, तिचा उंबरठा, पाऊलवाट, सलाम, सांजपर्व यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. दूरदर्शनवरील ‘तू सौभाग्यवती हो’ आणि ‘छत्रीवाली’ या मालिकांमधून त्यांनी घराघरांत ओळख मिळवली.
आई-मुलगी या जोडगोळीने एकत्र कामही केलं होतं. ‘तिचा उंबरठा’ (2015) या चित्रपटात ज्योती चांदेकर यांनी तेजस्विनीची सासू साकारली होती. या चित्रपटासाठी त्यांना झी गौरव पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा सन्मान मिळाला, तर तेजस्विनीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय प्रवासासाठी त्यांना बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक महत्वाचं पान पुसलं गेलं आहे.