“बिग बॉस मराठी सीझन 3” चा उपविजेता, ठाण्यातील रहिवासी आणि जिम व्यवसायिक जय दुधानेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. कुटुंबासह परदेशात जाण्याच्या तयारीत असतानाच मुंबई विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. जय दुधानेंवर तब्बल 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असून, या प्रकरणी 28 ऑगस्ट 2025 रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले.
या प्रकरणातील तक्रारदार प्रशांत महादेवराव पाटील (61), रा. ठाणे, हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले असून त्यांना व्यावसायिक गाळे खरेदी करायचे होते. मार्च 2024 मध्ये प्रॉपर्टी एजंट सुरेश झुलाल चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क झाला. चव्हाण यांनी अनिल दुधाने यांच्याकडे टियारा कमर्शियल कॉम्प्लेक्स, गांधीनगर, माजीवाडा, पोखरण रोड क्रमांक 2, ठाणे पश्चिम येथे पाच गाळे विक्रीसाठी असल्याची माहिती दिली.
यानंतर पाच गाळे खरेदी करण्याचे निश्चित झाले. तक्रारदाराने अनिल दुधाने आणि जय दुधाने यांची भेट घेतली. या पाच गाळ्यांची किंमत 4 कोटी 90 लाख रुपये ठरली आणि पाच लाख रुपयांची टोकन रक्कम देण्यात आली. मालमत्तेचे टायटल क्लीअर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काही काळानंतर अनिल दुधाने यांचे निधन झाले आणि संपूर्ण व्यवहारात जय दुधाने यांचा सहभाग वाढला.
या व्यवहारादरम्यान एक्सिस बँकेचे कर्ज फेडण्यासाठी तक्रारदारांकडून वेळोवेळी रक्कम घेण्यात आली. एकूण 4 कोटी 61 लाख 2 हजार रुपये घेण्यात आले, मात्र बँकेचे कर्ज फेडण्यात आले नाही. सुरुवातीला गाळ्यांचा ताबा देण्यात आला असला तरी कर्ज न भरल्यामुळे बँकेने जप्तीची कारवाई केली.
या प्रकारामुळे आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत तक्रारदारांनी जय दुधाने यांच्यासह अनघा दुधाने, प्रांजल दुधाने, आशा दुधाने आणि मोतीराम दुधाने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्यानंतर शनिवारी जय दुधाने हे परिवारासह परदेशात जात असतानाच मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत.