शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील; पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, हे आपल्या न्यायव्यवस्थेचे मूलभूत तत्त्व आहे. परिणामी सरसकट प्रथमदर्शी पुराव्यांवरून कोणालाही शिक्षा होत नाही. अत्यंत बारकाईने आणि दहा दिशांनी तपास करुन, पुरावे, साक्षीदार.. आदींचा ‘तारीख पे तारीख..’ असा गोतावळा झाला नंतरच शिक्षेची सुनावणी होते. कोण्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा होऊ नये; म्हणून हे केलं जात. पण, जर गुन्हा एक आणि संभाव्य गुन्हेगार दोन असतील.. आणि आता नेमकं ठरवता येत नाहीय की; दोघांपैकी खून केला कोणी? तर मग काय करायचं? या प्रश्नाचे रंजक उत्तर ‘गुमराह‘ सिनेमात आहे.
मुळात ‘गुमराह’ (Gumraah) हा बॉलिवूडच्या रिमेक साखळीतील एक सिनेमा आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थडप’ सिनेमाचा तो रिमेक आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदीत रिमेक करण्याचा मोह बॉलिवूडवाल्यांना आवरता येत नाही, त्यामुळेच ‘सेल्फी’, ‘शहजादा’ आणि ‘भोला’ या चित्रपटानंतर या आता ‘गुमराह’च्या रूपाने आणखी एक रिमेक आला आहे. किंबहुना प्रेक्षकांवर थोपवला गेलाय. होय, ‘थोपवला’ गेला आहे.
त्यामुळे वेळीच बॉलिवूडने या रिमेकच्या चकचकीत कचाट्यातून बाहेर पडायला हवं. वर्धन केतकरच्या दिग्दर्शनात या हिंदी रिमेकचे नायक-नायिका म्हणजे आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि मृणाल ठाकूर. (Mrunal Thakur) पण, प्रश्न असा आहे की दक्षिणेत आजमावलेली यशस्वी रेसिपी हिंदी चित्रपटांसाठीही तितकीच अनुकूल ठरेल का? तर ‘गुमराह’ पाहून म्हणायचं झालं तर.. ही रेसिपी मुळात चटपटीत आहे. ती चटपटीत दिग्दर्शकाला बनवता आलेली नाही. त्यामुळे हि रेसिपी अर्थात हा रिमेकचा मामला फसला आहे.
सिनेमाची कथा अतिशय थरारक पद्धतीने सुरू होते. दिल्लीत रात्री एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या झाली. एसीपी यादव (रोनित रॉय) आणि एसआय शिवानी माथूर (मृणाल ठाकूर) या खून प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. खूप विचारमंथन करूनही पोलिसांना काही सुगावा लागला नाही, पण शिवानीच्या प्रयत्नांमुळे खुन्याचा फोटो सापडतो. प्रथमदर्शी पुराव्याच्या आधारे पोलीस अर्जुन सेहगल (आदित्य रॉय कपूर) याला अटक करतात. मारेकरी त्यांच्या ताब्यात असल्याचा विश्वास ठेवून, पोलीस हे प्रकरण बंद करणार असतात; तेव्हा रॉनी (आदित्य रॉय कपूर) पोलिसांच्या तावडीत सापडतो. रॉनीचा चेहरा पाहून पोलिसांना धक्का असतो, कारण तो अर्जुन सेहगलसारखा हुबेहूब दिसत असतो. पुढे तपासात या दोघांविरुद्ध खुनाचे पुरावे हाती लागल्याने पोलिसांचा अधिकच गोंधळ उडतो. पण, जसजशी कथा पुढे सरकत जाते तसतसा खरा खुनी अर्जुन आहे की रॉनी हे सिद्ध करणे पोलिसांना अवघड होत जाते. त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या कोणी केली आणि त्याला मारण्याची गरज का निर्माण झाली? या दोन दिसण्यांमध्ये काय संबंध आहे? ही उत्तरे चित्रपट पाहिल्यानंतरच मिळतील?
दिग्दर्शक वर्धन केतकरने कथेची सुरुवात रंजक पद्धतीने केली आहे. पण, नंतरचा सिनेमा विशेष करुन पूर्वार्धात पटकथा गडबडली आहे. भरकटलेला सिनेमा उत्तरार्धात रंजक मार्गावर येतो. चित्रपटाला सूत्रधारी चित्रपटाप्रमाणे हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तो कथनाला मारक ठरतो. उत्तरार्धात, कथेने वळण घेत.. वेग घेतो, परंतु शेवट काय असेल हे तुम्हाला कळले असेल. त्यामुळे ते इकडे न लिहिलेलं बरं.. तुमचा अंदाज चूक आहे कि चूक? हे तुम्हीच सिनेमा पाहून ठरवा.
सिनेमा जरी एका सत्य घटनेतुन प्रेरित असला, तरी तो वास्तविक पद्धतीने मांडला गेलेला नाही. ॲक्शनच्या बाबतीत चित्रपट मजबूत आहे. पटकथा कमकुवत आहे आणि संगीत, गाण्यांचा विचार केला तर अनेक संगीतकार असूनही गाणी चित्रपटाला बळ मिळत नाहीत. हेमंत चतुर्वेदी यांच्या सिनेमॅटोग्राफीमध्ये चित्रित करण्यात आलेले रात्रीचे दृश्य पाहण्यासारखे झाले आहेत. पार्श्वसंगीत सरासरी आहे.
आदित्य रॉय कपूरला ‘गुमराह’मध्ये त्याच्या करिअरमधील कमाल स्क्रीन स्पेस मिळाली आहे. तो दुहेरी भूमिकेत आहे हे उघड आहे. एक भूमिका दुसऱ्यापेक्षा वेगळी करण्याचा त्याने सर्वतोपरी प्रयत्न केला आहे, तो पडद्यावर खूप देखणा आणि प्राभावी दिसतो. ॲक्शन सीन्समध्ये तो स्वतःला सिद्धही करतो. मृणाल ठाकूरने पोलिसाच्या भूमिकेला न्याय दिला आहे. खुर्रत पोलिसाच्या व्यक्तिरेखेत रोनित रॉय परिचित शैलीत दिसत आहे. एकंदरच ‘गुमराह’ हा सिनेमा ठिकठाक; बघण्याजोगा झाला आहे. आणि जरी तुम्ही पूर्वार्ध वगळून केवल.. उत्तरार्ध पाहिलात.. तरी तो तुमचं मनोरंजन करेल.. हे असं करायचं कारण म्हणजे, तुमचा वेळ वाचेल… बाकी तुमचा निर्णय!
सिनेमा : गुमराह (Gumraah)
निर्मिती : भूषण कुमार
दिग्दर्शक : वर्धान केतकर
लेखन : असीम अरोरा
कलाकार : आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकूर, रॉनीत रॉय
छायांकन : विनीत मल्होत्रा
संकलन : साहिल नायर
दर्जा : ३ स्टार