भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवी संधी मिळू शकते का? भारत आणि BRICS देशांमधील चित्रपट निर्माते एकत्र येऊन चित्रपटांची निर्मिती करू शकतील का? अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ५७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2026) चर्चा झाली. गोव्यात आयोजित BRICS Film Festival Roundtable मध्ये सहनिर्मिती, चित्रपटांचे वितरण, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि सांस्कृतिक भागीदारीच्या शक्यतांवर विचारमंथन करण्यात आले.
२२ नोव्हेंबर रोजी झालेल्या या बैठकीत रशिया, नायजेरिया, इंडोनेशिया आणि इराणचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. याशिवाय भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC) आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) यांचे अधिकारीही उपस्थित होते.
सहनिर्मिती आणि OTT वितरणावर भर
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात यांनी BRICS देशांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्याची भारताची भूमिका मांडली. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून वेगवेगळ्या देशांतील समाज, संस्कृती आणि जीवनशैली समजून घेण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत आयोजित BRICS WAVES Bazaar चा उल्लेख करत त्यांनी आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), अॅनिमेशन, गेमिंग आणि महिला नेतृत्व यांसारख्या विषयांवर झालेल्या चर्चेची माहिती दिली. विविध देशांतील निर्मात्यांना एकत्र आणून सहनिर्मितीसाठी भागीदार शोधण्याची संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डिजिटल टेलिव्हिजन आणि OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध देशांतील कंटेंटची देवाणघेवाण वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीच्या संधींचा अधिकाधिक उपयोग करून दीर्घकालीन भागीदारी निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हे देखील वाचा: IFFI 2026: NFDC आणि Sony Pictures एकत्र; लेखकांसाठी सुरू केली नवी संधी, काय आहे खास?
NFDC ने अधोरेखित केले सहनिर्मितीचे महत्त्व
परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव शंभू एल. हक्की यांनी चित्रपटांच्या माध्यमातून देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होऊ शकतात, असे सांगितले. IFFI ची यंदाची संकल्पना ‘Stories Without Borders’ याचा उल्लेख करताना, विविध देशांतील चित्रपटांमधून त्या देशांची संस्कृती आणि सामाजिक जीवन समजून घेण्याची संधी मिळते, असे त्यांनी नमूद केले.
NFDC चे अध्यक्ष जी. कृष्णकुमार यांनी मुंबईतील BRICS WAVES Bazaar चा उल्लेख करत या उपक्रमामुळे विविध देशांतील चित्रपट निर्माते आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणण्याचा पाया तयार झाल्याचे सांगितले. सहनिर्मितीच्या माध्यमातून या संबंधांना अधिक बळ मिळू शकते आणि वेगवेगळ्या देशांतील कथांना एकत्र आणण्याची संधी निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बांदेककर यांनी गोव्याला चित्रपट आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र असल्याचे सांगितले. चित्रपट वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचत असले तरी त्यातील भावना सर्वत्र सारख्याच असतात. त्यामुळे इतर देशांतील संस्कृती आणि अनुभव समजून घेण्यासाठी सिनेमा महत्त्वाची भूमिका बजावतो, असे त्यांनी नमूद केले.
नायजेरिया, रशिया आणि इंडोनेशियाने मांडल्या सहकार्याच्या शक्यता
भारतामधील नायजेरियाचे उच्चायुक्त सैदू दाहिरू मोहम्मद यांनी नायजेरियातील चित्रपटसृष्टीचा उल्लेख करत IFFI मध्ये नायजेरियन सिनेमाचा समावेश झाल्याचे स्वागत केले. भारत आणि नायजेरियामध्ये सहनिर्मिती, चित्रपट वितरण, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि कौशल्यविकास या क्षेत्रांत सहकार्याच्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले. अशा सहकार्यामुळे तरुणांसाठी आर्थिक संधीही निर्माण होऊ शकतात, असे त्यांचे मत होते.
मुंबईतील रशियन महासंघाच्या वाणिज्य दूतावासाचे कार्यवाहक कॉन्सुल जनरल अलेक्झांडर फुर्सोव्ह यांनी भारत आणि रशिया यांच्यातील चित्रपट महोत्सवांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख केला. अशा उपक्रमांमुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
भारतातील इंडोनेशियन दूतावासाच्या प्रथम सचिव एर्नी वाह्युनी यांनी भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील रामायण आणि महाभारताशी संबंधित सांस्कृतिक नात्याचा उल्लेख केला. दोन्ही देशांतील चित्रपट निर्माते आणि प्रोड्युसर्ससाठी परिचय दौरा आयोजित करण्याची कल्पना त्यांनी मांडली. यामुळे सहनिर्मितीच्या संधी शोधण्यास मदत होऊ शकते, असे त्या म्हणाल्या.
याशिवाय OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चित्रपटांचे वितरण, अॅनिमेशन आणि गेमिंग या क्षेत्रांमध्येही सहकार्याच्या संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातील उपक्रमांमध्ये सांस्कृतिक प्रतिनिधी, निर्माते आणि अॅनिमेशन क्षेत्रातील व्यावसायिकांना सहभागी करून घेण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
इराणकडूनही व्यापक सहकार्याची अपेक्षा
भारतातील इराणच्या दूतावासाचे उपप्रमुख डॉ. मोस्तफा गोहरिफार यांनी गोव्याची सांस्कृतिक विविधता अशा चर्चांसाठी योग्य असल्याचे सांगितले. चित्रपटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांतील लोक आणि त्यांचे सामाजिक जीवन समजून घेता येते. या बैठकीतून दोन्ही देशांच्या चित्रपट उद्योगांमध्ये तसेच समाजांमध्ये व्यापक सहकार्य निर्माण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बैठकीच्या समारोपात NFDC चे अध्यक्ष जी. कृष्णकुमार यांनी देश आणि संस्कृतींना जोडण्यामध्ये सिनेमाची भूमिका महत्त्वाची असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. या उपक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले.
हे देखील वाचा: IFFI 2026: नव्या पटकथाकारांसाठी प्रसार भारतीचा पुढाकार; ‘पेज से पिच तक’चे विजेते जाहीर
या चर्चेचा समारोप BRICS देशांमधील चित्रपटांची ओळख करून देणाऱ्या विशेष व्हिडिओच्या प्रदर्शनाने झाला. या माध्यमातून विविध देशांच्या चित्रपट परंपरा आणि कथांची झलक उपस्थितांना पाहायला मिळाली.
या बैठकीतून भारत आणि सहभागी देशांमधील चित्रपट सहकार्याच्या अनेक शक्यता समोर आल्या आहेत. सहनिर्मिती, वितरण, OTT, अॅनिमेशन आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून या भागीदारीला भविष्यात कोणते स्वरूप मिळते, याकडे आता चित्रपटसृष्टीचे लक्ष असेल.