Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या भावना आणि सिद्धूचं लग्न अगदी थाटामाटात पार पडताना दिसतंय. दळवी कुटुंबीयांनी भावनाच्या सुरक्षित भविष्यासाठी तर, गाडेपाटलांनी राजकारणातल्या फायद्याच्या गणितातून या लग्नाला मंजुरी दिली. विशेष म्हणजे सिद्धू आता लग्नानंतर केवळ भावना नाही, तर तिच्या बहिणी आनंदीचीही जबाबदारी स्वीकारणार आहे.
या पार्श्वभूमीवर मालिकेचं कथानक एक रोमांचक वळण घेतंय. गावात आणि गाडेपाटलांच्या घरात या लग्नामुळे घडामोडींचा कल्लोळ उडाला आहे. २३ जूनपासून ३० जूनपर्यंत प्रेक्षकांना आठवडाभर सिद्धू-भावनाच्या थाटामाटाच्या लग्नसोहळ्याची पर्वणी लाभणार आहे.
सुरुवातीला या लग्नाला विरोध झाला असला, तरी गाडेपाटलांना पक्षाच्या दबावामुळे अखेर होकार द्यावा लागतो. सिद्धू म्हणजे त्यांच्या घरातला लाडका राजकुमार, त्याचं लग्न थाटातच व्हायचं, यात शंका नाही. पण इकडे सिद्धूचं आधी जिच्यासोबत लग्न ठरलं होतं, तीच पूर्वी आता डाव खेळतेय. सिद्धूच्या आजीला आपल्या बाजूला करून पूर्वी लग्नात अडथळा आणायचा प्रयत्न करते. मात्र तिचे सारे डाव फसतात आणि भावना अखेरीस गाडेपाटलांची सून होते.
या भव्य लग्नासाठी ‘लक्ष्मी निवास’च्या युनिटने जबरदस्त मेहनत घेतली आहे. खास लग्नाच्या वरातीचा सीन शूट करताना सततच्या पावसामुळे अनेक अडथळे आले. पावसाळी हवामानामुळे चित्रीकरण वारंवार थांबवावं लागलं. मात्र कलाकार आणि तंत्रज्ञांनी एकदिलाने तब्बल १० तास सलग वरातीचं शूटिंग यशस्वी केलं.
या शूटिंगमध्ये एकाच वेळी २५-३० कलाकार, बँडवाल्यांचं संपूर्ण सेटअप, सजवलेली घोडी, आणि इतर टेक्निकल गोष्टी यांचं व्यवस्थापन करणं म्हणजे एक मोठं आव्हान होतं. पण संपूर्ण टीमनं समन्वयाने हे दृश्य प्रेक्षकांसमोर दर्जेदार पद्धतीनं साकारलं.
हे लग्न म्हणजे नात्यांमधलं गुंतागुंत, राजकीय दबाव आणि सामाजिक प्रतिष्ठेचं एकत्रित दर्शन आहे. भावना-सिद्धूचं हे लग्न मालिकेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे आणि त्यानंतर ‘लक्ष्मी निवास’ पुढे कोणतं वळण घेणार, याची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे.
‘लक्ष्मी निवास’ ही मालिका दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत ‘झी मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येते.