छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही लोकप्रिय जोडी आता मराठी रुपेरी पडद्यावर ‘जब्राट’ अशा रोमँटिक अंदाजात झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिकेनंतर ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार, याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून होतं — आणि अखेर त्याचं उत्तर ‘जब्राट’ या चित्रपटातून मिळालं आहे.
तारा करमणूक निर्मित आणि प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ या मराठी चित्रपटात आयुष आणि अनुष्का प्रिन्स आणि निशा या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या दोघांची लव्हेबल केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना येत्या ६ फेब्रुवारीपासून मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं शानदार पोस्टर आणि ‘तू आणि मी’ हे रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

‘लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स’ असा मनोरंजनाचा जबरदस्त मसाला असलेला ‘जब्राट’ हा संगीतमय चित्रपट कॉलेज विश्वातील तरुणाईच्या आयुष्याशी जोडलेल्या वेगळ्या, पण तितक्याच भावस्पर्शी गोष्टी मांडतो. या चित्रपटात आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे यांच्यासोबत वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट आणि प्रगती कोळगे यांच्या भूमिका आहेत. तसेच संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर आणि गणेश यादव यांसारखे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे आहेत. छायांकनाची जबाबदारी अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली असून, सहाय्यक असोसिएट म्हणून चार्लेस गोम्स कार्यरत आहेत. नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांचं असून, वेशभूषेची जबाबदारी युगेशा ओमकार यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचं संगीत डॉ. जयभीम शिंदे यांचं असून, बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमप, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर आणि स्वाती शिंदे यांच्या आवाजाने गाणी सजली आहेत.