तरुणाईच्या उत्साहाला भिडणारं आणि नवरात्रीत सगळीकडे गाजणारं गाणं म्हणजेच गायक अभिजीत सावंतचं प्रेमरंग सनेडो! इंडियन आयडॉलपासून ते बिग बॉसपर्यंत आणि संगीत विश्वात कायमच प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिजीत, पुन्हा एकदा चर्चेत आलाय त्याच्या या खास नवरात्री स्पेशल गाण्यामुळे.
अभिजीतच्या दमदार आवाजातलं आणि त्याने स्वतः संगीतबद्ध केलेलं हे गाणं, रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला लागलं. केवळ ऑनलाइनच नाही तर रास-दांडियाच्या कार्यक्रमातही प्रेमरंग सनेडो हा उत्सवाचा हिट ट्रॅक ठरत आहे.
अभिजीत सांगतो, “आपल्याकडे नवरात्रीसाठी अनेक लोकप्रिय गाणी आहेत, पण या गाण्यावर चाहत्यांनी दिलेला प्रतिसाद अविस्मरणीय आहे. लहानमोठ्या फॅन्सनी तयार केलेल्या रील्समधून मिळणारं प्रेम ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी कमाई आहे. हे गाणं आता गरबा अँथम म्हणून लोकांच्या ओठांवर आहे, हेच माझ्या कामाचं खरं यश आहे.”
गुजराती मूळ असलेलं पण मराठमोळा टच देणारं प्रेमरंग सनेडो हे गाणं प्रेक्षकांना खूप भावलं आहे. अभिजीतच्या पहिल्याच गुजराती गाण्याच्या प्रयोगाला प्रचंड प्रेम मिळतंय, आणि मराठीसोबतच गुजराती प्रेक्षकांनीही गाण्याला उचलून धरलं आहे.
संगीत क्षेत्रात तब्बल 20 वर्षांहून अधिक काळ आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिजीत, नवनवीन गाणी आणि हटके प्रोजेक्ट्ससह चाहत्यांना खुश करण्यास सदैव तयार असतो. प्रेमरंग सनेडो च्या यशानंतर तो पुन्हा एकदा सिद्ध करतोय की “ट्रेंडिंग गाणी आणि अभिजीत सावंत” हे समीकरण आता अटळ आहे.