रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ या बहुचर्चित सिनेमाच्या लॉस एंजेलिस प्रीमियरनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांची चर्चा सुरू झाली आहे. सिनेमाचा भव्य आवाका, कलाकारांचा अभिनय, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि बॅकग्राउंड स्कोअर यांचं प्रेक्षकांकडून कौतुक होत असल्याचं समोर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये दिसत आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या सिनेमात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय महाकाव्याची भव्य मांडणी मोठ्या पडद्यावर कशी साकारली आहे, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
भव्य दृश्यं आणि संगीताची चर्चा
सिनेमातील व्हिज्युअल इफेक्ट्स, पार्श्वसंगीत आणि महाकाव्याचं चित्रण या गोष्टींना प्रेक्षकांनी विशेष पसंती दिल्याचं दिलेल्या प्रतिक्रियांमधून समोर येत आहे. एका सोशल मीडिया युजरने हा सिनेमा भव्य अनुभव देणारा असल्याचं म्हटलं आहे. सिनेमाचा आवाका आणि मोठ्या पडद्यावर साकारलेली दृश्यं ही त्याची खासियत असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आली आहे.
साई पल्लवीच्या भूमिकेचीही चर्चा होत आहे. तिचा सहज अभिनय, चेहऱ्यावरचे भाव आणि पडद्यावरील उपस्थिती यांचं कौतुक केलं जात आहे. रणबीर कपूर आणि यश यांच्या भूमिकांनाही प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं या सुरुवातीच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे.
======
हे देखील वाचा : ‘बकाइती’ ते ‘मिर्झापूर’; राजेश तैलंग यांच्या ५ लक्षवेधी भूमिका
======
‘रामायण’ कधी होणार रिलीज?
नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने DNEG आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने केली आहे. हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दिलेल्या माहितीनुसार, ‘रामायण’चा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्याची योजना आहे.