भारतातील अग्रगण्य स्वदेशी शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Moj ने आपल्या ‘मायक्रो ड्रामा चॅलेंज’च्या मार्च महिन्यातील विजेत्यांची घोषणा केली आहे. ShareChat चा भाग असलेल्या या उपक्रमाचा उद्देश नव्या आणि उभरत्या कथाकारांना प्रकाशझोतात आणणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी भक्कम व्यासपीठ देणे हा आहे.
हा उपक्रम खास तयार करण्यात आला असून, विजेत्यांना दरवर्षी तब्बल २४ कोटी रुपयांच्या निधीचा लाभ मिळणार आहे. यामुळे नव्या निर्माते आणि निर्मिती संस्थांना केवळ आपली कला दाखवण्याची संधीच नाही, तर ती अधिक मोठ्या प्रमाणात विकसित करण्याचीही संधी मिळणार आहे.
या चॅलेंजमुळे देशभरातील अनेक नव्या कथाकारांसाठी दारे खुली झाली आहेत. मायक्रो ड्रामा या नव्या फॉरमॅटमध्ये काम करणाऱ्या निर्मात्यांना आपली कथा मांडण्याची, आर्थिक पाठबळ मिळवण्याची आणि आपल्या कौशल्याला पैलू पाडण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, या स्पर्धेत देशभरातून १०० हून अधिक व्यावसायिक प्रवेशिका आल्या, ज्यातून या फॉरमॅटची वाढती लोकप्रियता स्पष्ट होते.
महिनाभर चाललेल्या या कडव्या स्पर्धेत सहभागी झालेल्यांना स्वतःच्या कथा मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रभावी मंच मिळाला. या स्पर्धेत अखेर ‘ट्रू ड्रीम्स एंटरटेनमेंट’ने “थुकरा के मेरा प्यार” या मालिकेद्वारे पहिले स्थान पटकावत २५ लाख रुपयांचे बक्षीस जिंकले.
त्यांच्या पाठोपाठ ‘सिने शॉर्ट प्रीमियर’च्या “पैसा प्यार परिवार” या मालिकेला १५ लाख रुपये मिळाले, तर ‘तमाशा’च्या “द डर्टी वेडिंग” या मालिकेला १० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.
नजरबट्टू क्रिएशन्स, एम२आर आणि हमारा मूव्हीज यांसारख्या इतर स्पर्धकांनीही या क्षेत्रात आपली मजबूत ओळख निर्माण केली असली, तरी त्यांना अंतिम तीनमध्ये स्थान मिळवता आले नाही.
या उपक्रमाबद्दल बोलताना ShareChat चे सहसंस्थापक आणि मुख्य वित्त अधिकारी मनोहर सिंग चारण यांनी सांगितले की, “मायक्रो ड्रामा हा आजच्या मोबाईलवर आधारित प्रेक्षकांसाठी अतिशय प्रभावी कथन प्रकार ठरत आहे. या चॅलेंजद्वारे आम्ही नव्या कथाकारांना केवळ व्यासपीठच नाही, तर खऱ्या संधी देण्याचा प्रयत्न केला आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या उपक्रमासाठी वार्षिक निधी २४ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि पुढील आवृत्तीसाठीही मोठ्या प्रमाणावर प्रवेशिका येऊ लागल्या आहेत.
आजच्या बदलत्या डिजिटल युगात, लघुरूपातील कथाकथन वेगाने विकसित होत आहे. या पार्श्वभूमीवर ShareChat, Moj आणि क्विक टीव्ही हे मंच नव्या कल्पनांना प्रोत्साहन देत असून, भारतातील मनोरंजन पाहण्याच्या पद्धतीत नवे बदल घडवत आहेत.