स्टार प्रवाहवर नुकतीच सुरू झालेली ‘वचन दिले तू मला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मालिकेला भरभरून प्रेम मिळत आहे. न्यायासाठी लढणारी, ध्येयवेडी आणि आत्मविश्वासू अॅडव्होकेट ऊर्जा शिंदे तिच्या आयुष्यातील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची केस लढण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिली केस लढण्याआधी ऊर्जाने प्रसिद्ध सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. न्यायाच्या वाटेवर पहिले पाऊल टाकताना ऊर्जासाठी ही भेट खूपच अर्थपूर्ण ठरली आहे.
या भेटीबद्दल सांगताना ऊर्जाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे म्हणाली, “उज्वल निकम सरांना भेटून मनापासून आनंद झाला. त्यांनी दिलेला वेळ, प्रेमळ शब्द आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. हा क्षण मी कायम लक्षात ठेवेन,” अशी भावना अनुष्काने व्यक्त केली.
खास बाब म्हणजे, निष्णात वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात ऊर्जा न्यायालयात उभी राहणार आहे. ऊर्जाची ही पहिली केस केवळ एक खटला न राहता, न्यायासाठीचा एक निर्णायक संघर्ष ठरणार आहे. या संघर्षात ऊर्जा स्वतःला कशी सिद्ध करणार, हे पाहण्यासाठी ‘वचन दिले तू मला’ नक्की पहा, दररोज रात्री ९.३० वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.