भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर कर्तृत्व ठरलेला ‘शोले’ चित्रपटाला आज ५० वर्ष पूर्ण झाली. १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या जी. पी. सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित या सिनेमाने पाच दशकांनंतरही प्रेक्षकांच्या मनात आपली जादू कायम ठेवली आहे.
या ऐतिहासिक प्रसंगाच्या निमित्ताने महाराष्ट्र डाक सर्कल आणि भारतीय डाक विभागाने आज, १५ ऑगस्ट २०२५ रोजी, एका विशेष कार्यक्रमात स्पेशल कॅन्सलेशन, आकर्षक पिक्चर पोस्टकार्ड आणि एक प्रेझेंटेशन पॅकचे अनावरण केले. हा सिने-संस्कृती व फिलॅटेलीचा अनोखा संगम ठरला.

मुख्य पोस्टमास्टर जनरल श्री अमिताभ सिंह यांनी अधिकृतपणे पोस्टकार्ड प्रकाशित करताच उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिला अल्बम स्वतः दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना देण्यात आला. या सोहळ्यात शहजाद सिप्पी, रोहन सिप्पी, किरण जुनेजा सिप्पी आणि शिवेंद्र सिंग डुंगरपूर यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाला फिलॅटेली प्रेमी, मीडिया प्रतिनिधी आणि शोलेचे असंख्य चाहते उत्साहाने उपस्थित होते. तसेच भारतीय डाक विभागातील वरिष्ठ अधिकारी — श्रीमती केया अरोरा, सुश्री सिमरन कौर आणि श्रीमती रेखा रिझवी — यांनीही उपस्थित रहात कार्यक्रमाची शोभा वाढवली.
‘शोले’ने पन्नास वर्षांनंतरही भारतीय चित्रपटसृष्टी व सांस्कृतिक क्षेत्रात आपले अढळ स्थान टिकवून ठेवले आहे. हा सुवर्ण सोहळा त्या जादुई प्रवासाचा साक्षीदार ठरला.