महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड मानला जाणारा २२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव दिनांक ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील निवडक कलाकृतींचा समावेश असून, यंदा एकूण ५६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
हे सर्व चित्रपट प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (मिनी थिएटर) आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस येथे प्रदर्शित होणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवलेल्या, बूसान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार मिळवलेल्या ‘ऑन यूअर लॅप (पांगकू)’ या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
“२२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो आहे. गेल्या बावीस वर्षांपासून हा महोत्सव आशियाई आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचवत आहे. यंदा माझे वडील डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अजरामर चित्रपटांचे प्रदर्शन होणार, हा आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंदाचा क्षण आहे,” असे आशियाई फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांनी सांगितले.
सन २००२ पासून आशियाई फिल्म फाऊंडेशनतर्फे या महोत्सवाचे आयोजन सुरू असून, जगभरातील नामवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट मुंबई व महाराष्ट्रातील रसिकांना पाहता यावेत, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. गेली बावीस वर्षे हा महोत्सव सातत्याने मुंबई आणि ठाण्यात भरवण्यात येत आहे.
“यावर्षी ५६ निवडक चित्रपटांद्वारे प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण आणि समृद्ध सिनेमॅटिक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. किर्गिस्तान कंट्री फोकस, मराठी व भारतीय चित्रपटांची स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांमुळे हा महोत्सव खऱ्या अर्थाने चित्रपटप्रेमींसाठी उत्सव ठरेल,” अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. संतोष पाठारे यांनी दिली.
या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे मराठी, भारतीय आणि आशियाई चित्रपटांचे स्पर्धा विभाग. मराठी चित्रपट स्पर्धा विभागात ११ मराठी चित्रपट दाखवले जाणार असून त्यामध्ये एप्रिल मे ९९, सांगळा, गमन, गिराण, गोंधळ, किमिडीन, निर्जळी, प्रिझम, साबर बोंड, सोहळा आणि उत्तर या चित्रपटांचा समावेश आहे.
“थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात माझा ‘उत्तर’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटांसोबत मराठी सिनेमे स्पर्धेत सहभागी होणं ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी संधी आहे. अशा व्यासपीठांमुळे नव्या चित्रपटकारांना दिशा मिळते,” असे ‘उत्तर’ चित्रपटाचे दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांनी सांगितले.
भारतीय चित्रपट स्पर्धा विभागात आसामी, कन्नड, मणिपूरी, मल्याळी, बंगाली आणि नेपाळी भाषांतील १२ चित्रपट असतील. तर आशियाई स्पेक्ट्रम विभागात चीन, जपान, हाँगकाँग, तुर्की, कझाकस्तान, व्हिएतनाम, इराण, फिलिपिन्स आणि थायलंडमधील चित्रपट दाखवले जाणार आहेत. यावर्षीच्या कन्ट्री फोकस विभागात किर्गिस्तान या देशाचा समावेश असून, तेथील समकालीन व पारंपरिक कथांवर आधारित चित्रपट सादर केले जाणार आहेत.
या महोत्सवात ज्येष्ठ दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’, तर उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दिवंगत सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीचा विशेष चित्रपट लेखन पुरस्कार चित्रपट अभ्यासक व क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त दो आँखे बारा हाथ, डॉ. कोटनीस की अमर कहानी, कुंकू आणि नवरंग हे अजरामर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. चित्रपट प्रदर्शनासोबतच ओपन फोरम, मास्टर क्लासेस आणि ज्युरी सदस्यांशी संवाद अशा विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी www.thirdeyeasianfilmfestival.com या संकेतस्थळावर सुरू झाली आहे.