मुंबईचा जीव असलेला वडापाव आणि त्याच्यासारखंच झणझणीत गाणं – असं भन्नाट टायटल ट्रॅक घेऊन ‘वडापाव’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. “प्रेमात पडायचं तर कडकडीतच आणि प्रेमात पाडायचं तर झणझणीतच… वडापावसारखंच!” या हटके ओळींसह प्रदर्शित झालेलं गाणं रसिकांच्या कानावर आणि मनावर भन्नाट ठसा उमटवत आहे.
कुणाल–करण यांचे दमदार शब्द आणि ठेक्यांची मस्त जोड, त्यात नकाश अझीझ यांचा जोशपूर्ण आवाज… यामुळे या टायटल ट्रॅकची झणझणीत रेसिपी तयार झाली आहे. ऐकताच पाय थिरकायला लावणारे बीट्स आणि मुंबईची अस्सल चव या गाण्यात जाणवते.
दिग्दर्शक प्रसाद ओक सांगतात, “आमचं उद्दिष्ट फक्त गाणं बनवणं नव्हतं, तर मुंबईचा आत्मा टिपणं होतं. हे गाणं प्रत्येकाला नाचवेल, यात शंका नाही.”
गीतकार-संगीतकार कुणाल–करण यांच्या मते, “वडापाव जसा साधा असूनही झणझणीत आहे, तसंच हे गाणं साध्या पण मनाला भिडणाऱ्या शब्दांनी आणि जोशपूर्ण संगीतातून तयार झालं आहे.”
२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा ‘वडापाव’ हा कौटुंबिक चित्रपट गोड नात्यांची चवदार गोष्ट मांडणार आहे. टायटल ट्रॅकने प्रेक्षकांची उत्सुकता दुपटीने वाढवली आहे.
या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे अशा दमदार कलाकारांचा सहभाग आहे.
‘वडापाव’ चित्रपटाची निर्मिती एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान यांनी सिनेमॅटिक किडा या बॅनरखाली केली आहे. निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून, सहनिर्माते तबरेझ एम. पटेल व सानीस खाकुरेल आहेत. छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे तर लेखन सिद्धार्थ साळवी यांचे आहे.