स्वरा भास्कर CJP Protest या घडामोडीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या Cockroach Janta Party (CJP) च्या आंदोलनाला भेट देत आंदोलनकर्त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. याचवेळी तिने उपोषणावर असलेल्या शिक्षणतज्ज्ञ, अभियंता आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचीही भेट घेतली. (Swara Bhasker CJP Protest)
जंतरमंतरवरील भेटीनंतर स्वरा भास्करने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही छायाचित्रे शेअर केली. त्यापैकी एका पोस्टमध्ये तिने Cockroach Janta Party चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासोबतचा फोटो शेअर करत, “आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लढत राहिल्याबद्दल धन्यवाद,” असा संदेश लिहिला.
त्यानंतर तिने सोनम वांगचुक यांच्यासोबतचे छायाचित्र पोस्ट करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. स्टोरीमध्ये तिने, “अदम्य सोनम वांगचुक सर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लढत आहेत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आणि कृतज्ञता,” असे म्हटले.
सोनम वांगचुक हे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात अनिश्चितकालीन उपोषण करत असून, त्यांच्या उपोषणाचा हा १७ वा दिवस आहे.
दरम्यान, या आंदोलनाला यापूर्वीही अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा, असे आवाहन केले होते.
‘3 इडियट्स’ चित्रपटातील चतुर रामलिंगम या भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेले अभिनेता ओमी वैद्य यांनीदेखील इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत नागरिकांना या उपोषणाबाबत आवाज उठवण्याचे आवाहन केले.
याशिवाय अभिनेते नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह तसेच अनेक लेखक आणि शिक्षणतज्ज्ञांनी आंदोलनकर्त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन करत त्यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी सरकारने या विषयावर लवकरात लवकर सकारात्मक संवाद सुरू करावा, अशी भूमिका मांडली आहे.
======
हे देखील वाचा : रणबीर कपूरची पुण्याजवळ 25 एकर जमिनीत मोठी गुंतवणूक; किंमत तब्बल 16.42 कोटी रुपये
======