बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. उद्योगपती अनंत अंबानी आणि आध्यात्मिक गुरू सद्गुरू यांच्याशी संबंधित एका व्हिडीओमध्ये शाहरुखला शांत राहण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्यावर आक्षेप घेत शाहरुखच्या कायदेशीर टीमने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुविग्या शर्मा याला मानहानीची नोटीस पाठवली आहे.
२३ नोव्हेंबर रोजी पाठवण्यात आलेल्या या नोटीसमध्ये संबंधित इन्स्टाग्राम रीलमधील मजकूर दिशाभूल करणारा आणि बदनामीकारक असल्याचं म्हटलं आहे. तसेच या व्हिडीओमुळे शाहरुख खानची प्रतिमा आणि प्रतिष्ठा खराब होऊ शकते, असा आक्षेपही त्याच्या कायदेशीर टीमने नोंदवला आहे.
नेमका काय आहे व्हायरल व्हिडीओचा वाद?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रीलमध्ये सद्गुरू आणि अनंत अंबानी यांच्या भेटीचे फुटेज तसेच शाहरुख खान आणि अनंत अंबानी यांच्यातील संवादाचा स्वतंत्र व्हिडीओ दाखवण्यात आला होता.
सुविग्या शर्मा याने या व्हिडीओसोबत केलेल्या दाव्यानुसार, या संवादादरम्यान शाहरुख खानला शांत राहण्यास सांगण्यात आलं होतं. या दाव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. मात्र, शाहरुखच्या कायदेशीर टीमने या दाव्याला पूर्णपणे खोटं आणि निराधार ठरवत त्यावर आक्षेप घेतला आहे.
हे देखील वाचा : Deepika Padukoneच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीला करण जोहरचा पाठिंबा; म्हणाला, ‘हा तिचा अधिकार आहे’
४८ तासांत रील हटवण्याची मागणी
शाहरुखच्या कायदेशीर टीमने पाठवलेल्या नोटीसमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३५६ चा उल्लेख करण्यात आला आहे. हे कलम मानहानीशी संबंधित आहे.
या नोटीसमध्ये सुविग्या शर्माकडे पाच प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
१) संबंधित इन्स्टाग्राम रील तातडीने हटवावी.
२) शाहरुखबाबत करण्यात आलेला दावा पुढे प्रसारित करू नये.
३) व्हिडीओसोबतचे दिशाभूल करणारे कॅप्शन आणि संबंधित मजकूर हटवावा किंवा दुरुस्त करावा.
४) मूळ व्हिडीओ, फुटेज आणि पोस्टशी संबंधित सर्व रेकॉर्ड जतन करून ठेवावेत.
५) नोटीस मिळाल्यानंतर ४८ तासांच्या आत केलेल्या कारवाईची लेखी माहिती द्यावी.
इन्फ्लुएन्सरचंही प्रत्युत्तर
नोटीस मिळाल्यानंतर सुविग्या शर्माने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर करत शाहरुख खानच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आपण केलेली टिप्पणी ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकारांतर्गत येते, असा युक्तिवाद त्याने केला.
या प्रकरणात शाहरुखच्या कायदेशीर टीमने आक्षेप घेतला असला, तरी पुढे सुविग्या शर्मा काय भूमिका घेतो आणि या कायदेशीर वादाचं पुढे काय होतं, याकडे लक्ष लागलं आहे.
हे देखील वाचा : ‘किंग’मधील ‘तू मिल जाए’ गाणं रिलीज; शाहरुख-दीपिकाची केमिस्ट्री आणि अरिजित-एड शीरनच्या खास Collaborationची चर्चा
शाहरुखचा आगामी चित्रपट ‘किंग’
दरम्यान, शाहरुख खान लवकरच ‘किंग’ या अॅक्शनपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख पहिल्यांदाच मुलगी सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.