Home » छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’साठी सज्ज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’साठी सज्ज

भव्य रंगमंच, डोळे दिपवणारी रोषणाई, मंत्रमुग्ध करणारे वातावरण आणि ढोल-ताशांच्या गजराची भारावून टाकणारी साथ… या सगळ्यांच्या साक्षीने जेव्हा भरजरी वस्त्र परिधान केलेले, शिरोभागी आकर्षक जिरेटोप, गळ्यात आभूषणांसह कवड्यांची माळ, कमरेला भवानी तलवार आणि घोड्यावर स्वार झालेले साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी शिलेदार अवतरले, तेव्हा उपस्थितांमध्ये एकच जल्लोष उसळला. निमित्त होते ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी भव्य मराठी चित्रपटातील एका खास प्रसंगाच्या सादरीकरणाचे.

शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आग्रा भेटीचा अध्याय आता ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, तसेच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ३० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘शिवराज अष्टक’ मालिकेतील सहावे पुष्प असलेल्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रथमदर्शन यावेळी उपस्थितांना अनुभवता आले. या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत नव्या दमाचा, उमदा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र झळकणार आहे.

या कार्यक्रमात चित्रपटातील ‘महारुद्र शिवराय’ या गीताचे दमदार सादरीकरण देखील सादर करण्यात आले. दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेल्या या गीताला अवधूत गांधी आणि अमिता घुगरी यांचा स्वरसाज लाभला असून, अवधूत गांधी आणि मयूर राऊत यांचे संगीत गीताला लाभले आहे. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. विशेष म्हणजे, ‘मुगाफी पल्स’ या अॅप्लिकेशनचा वापर करून या चित्रपटाच्या पटकथेचे विश्लेषण करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचक ठरली आहे. त्यातीलच आग्रा भेट ही अत्यंत जोखमीची आणि धाडसी घटना होती. या भेटीतून महाराजांचे नेतृत्व, शौर्य आणि धोरणात्मक रणनीती यांची खरी झलक दिसून येते, जी प्रेक्षकांना या चित्रपटातून अनुभवता येणार आहे.

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy