‘सायको रंगा’ टीझर प्रदर्शित; अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या रंगाच्या दमदार अ‍ॅक्शनची झलक

'सायको रंगा'च्या टीझरमधून अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या रंगाची दमदार झलक पाहायला मिळते.

मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका अ‍ॅक्शन पटाची भर पडणार असून ‘सायको रंगा’ या चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित झाला आहे. रहस्य, अ‍ॅक्शन आणि सामाजिक संघर्ष यांचा मिलाफ असलेल्या या टीझरने चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे.

टीझरमध्ये अन्यायाविरुद्ध ठामपणे उभा राहणाऱ्या ‘रंगा’ची झलक दाखवण्यात आली आहे. शहरातील अ‍ॅक्शनचा थरार आणि गावाकडच्या मातीतून उभा राहिलेला संघर्ष यांची सांगड घालत चित्रपटाची कथा पुढे सरकताना दिसते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा हा गूढ व्यक्तिमत्त्वाचा नायक नेमका कोण आहे, त्याच्या संघर्षामागचं रहस्य काय आहे आणि तो बलाढ्य विरोधकांचा सामना कसा करणार, याची उत्तरं चित्रपटात मिळणार आहेत.

या चित्रपटातून ‘विजेता’ नंतर पुन्हा एकदा सुबोध भावे आणि देवेंद्र चौगुले मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत मिलिंद शिंदे, पुष्कर जोग, जान्हवी किल्लेकर, स्मिता गोंदकर, संजय मोहिते (दादू), आनंद काळे, उमेश बोळके, रंजना कुलकर्णी, अमोल नाईक, अनिल राबाडे, एन. डी. चौगुले, सचिन मोरे आणि प्रकाश धोत्रे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

चित्रपटाबाबत बोलताना देवेंद्र चौगुले म्हणाले, “प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक चित्तथरारक अनुभव असेल. निखळ प्रेम, कर्तव्यदक्षता आणि अघोरी महत्त्वाकांक्षेमुळे एका सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात निर्माण झालेलं वादळ तसेच परिस्थितीपुढे न झुकता लढण्याची त्याची जिद्द आम्ही प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक वास्तवाची ठोस मांडणीही या चित्रपटात आहे. ही कथा एका युवकाच्या स्वाभिमानाची आणि त्याच्या अविश्वसनीय संघर्षाची आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”

‘सायको रंगा’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती देवेंद्र चौगुले यांनी केली असून स्नेहलराज (दादू) यांनी सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. संगीतकार उत्तम चोरडे यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

अ‍ॅक्शन, स्टंट्स, रोमान्स, ड्रामा आणि संगीताचा संगम असलेला ‘सायको रंगा’ हा चित्रपट येत्या सप्टेंबरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

=======

हे देखील वाचा : ‘द्विधा’मध्ये मानसी कुलकर्णीची लेक ओवीची एंट्री; मायलेकीची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

=======

Spread the love

Related posts

‘द्विधा’मध्ये मानसी कुलकर्णीची लेक ओवीची एंट्री; मायलेकीची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘द्विधा’मधून निमिष कुलकर्णीचे मराठी चित्रपटात पदार्पण; २१ ऑगस्टला प्रदर्शित होणार भावनिक कथा

‘भूतम भयम्’साठी करण सोनावणेने शिकली मालवणी भाषा; भूमिकेसाठी घेतली विशेष मेहनत

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More