आयुष्मान खुराना, सारा अली खान, वामिका गब्बी आणि रकुल प्रीत सिंह यांचा ‘पती पत्नी और वो दो’ हा चित्रपट पूर्णपणे गोंधळ, गैरसमज आणि मजेशीर प्रसंगांवर चालतो. ‘पती पत्नी और वो’ या जुन्या संकल्पनेला यावेळी थोडा नवा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फरक इतकाच की यावेळी कथेत एक नाही तर दोन ‘वो’ आहेत.
प्रजापती पांडे (आयुष्मान खुराना) हा प्रयागराजमध्ये राहणारा वनाधिकारी. पत्नी अपर्णा (वामिका गब्बी) सोबत त्याचं सगळं सुरळीत सुरू असताना अचानक त्याच्या आयुष्यात जुनी मैत्रीण चंचल कुमारी (सारा अली खान) एंट्री घेते. चंचल तिच्या प्रेमप्रकरणामुळे अडचणीत अडकलेली असते आणि मदतीसाठी प्रजापतीकडे येते. इथून सुरू होतो खोटं बोलणं, गैरसमज, पाठलाग आणि फुल ऑन गोंधळ.
या सगळ्यात प्रजापतीची सहकारी निलोफर खान (रकुल प्रीत सिंह), स्थानिक आमदार, पोलीस आणि बाकी पात्रंही अडकत जातात. कथा पुढे जाताना चित्रपट पूर्णपणे गोंधळातून तयार झालेल्या कॉमेडीत बदलतो.
चित्रपटाची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्याचे संवाद. अनेक डायलॉग्स खरोखरच हसू आणतात. ९०च्या दशकातील गाणी आणि चित्रपटांचे संदर्भ मजा आणतात. दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी विनोद करताना उगाचच अश्लीलपणा टाकलेला नाही, ही चांगली गोष्ट आहे.
पूर्व उत्तर प्रदेशची बोलीभाषा चित्रपटात चांगली वापरली आहे. “बे”, “काहे”, “गुरु”, “मियाँ” असे शब्द कथेला वेगळी मजा आणतात. हिंदू-मुस्लिम मैत्रीही हलक्याफुलक्या पद्धतीने दाखवली आहे.
मात्र चित्रपट सुरुवातीला थोडा संथ वाटतो. पहिल्या काही मिनिटांमध्ये कथा पकड घ्यायला वेळ घेते. इंटरव्हलनंतर मात्र चित्रपटाचा वेग वाढतो आणि कॉमेडी जास्त मजा आणते. पण काही ठिकाणी गोंधळ इतका वाढतो की नेमकं काय सुरू आहे हेच कळेनासं होतं.
प्रयागराज शहर अजून थोडं रॉ आणि वास्तववादी दाखवता आलं असतं. काही कलाकारांची भाषा काही ठिकाणी नैसर्गिक वाटत नाही. काही प्रसंग खूप मोठ्या आवाजात आणि ओव्हर वाटतात.
Pati Patni Aur Woh Do Marathi Review
अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर आयुष्मान खुराना हा चित्रपटाचा जीव आहे. त्याची कॉमिक टायमिंग आणि सहज अभिनय चित्रपटाला सतत एनर्जी देतात. सारा अली खान स्क्रीनवर भरपूर एनर्जी घेऊन येते. वामिका गब्बीने तिची भूमिका छान साकारली आहे, तर रकुल प्रीत सिंहनेही चांगली छाप सोडली आहे.
तिग्मांशू धुलिया, विजय राज, आयेशा रझा आणि दुर्गेश कुमार या कलाकारांनी चित्रपटाला अजून मजेशीर बनवलं आहे.
‘पती पत्नी और वो दो’ हा लॉजिक शोधण्यासाठी नाही तर निव्वळ मनोरंजनासाठी बनवलेला चित्रपट आहे. काही ठिकाणी कॉमेडी जोरदार जमते, तर काही ठिकाणी चित्रपट जास्तच गोंधळलेला वाटतो. पण आयुष्मान खुरानाचा अभिनय, मजेशीर संवाद आणि हलकाफुलका अंदाज यामुळे हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही.
जर तुम्हाला गोंधळातून तयार होणारी कॉमेडी आणि हलकाफुलके बॉलिवूड चित्रपट आवडत असतील, तर हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडू शकतो.
सिनेमा : पती पत्नी और वो दो (Pati Patni Aur Woh Do)
निर्माता : भूषण कुमार, कृष्ण कुमार, जुनो चोप्रा
लेखक-दिग्दर्शक : मुदस्सर अजीज
कलाकार : आयुष्मान खुराना, सारा अली खान, वामिका गब्बी, रकुल प्रीत सिंह, विजय राज, तिग्मांशू धुलिया
दर्जा : ⭐⭐☆☆☆
======
हे देखील वाचा : ‘Ek Din’ Review: मनाला स्पर्श करणारा आणि साधेपणातली सुंदरता जपणारा सिनेमा
======