प्रत्येकाच्या यशामागे आणि व्यक्तिमत्त्वामागे आईचा मोठा वाटा असतो. घर सांभाळण्यापासून ते मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यापर्यंत आई अनेक भूमिका सहज निभावत असते. त्यामुळेच आईला घराची ‘सीईओ’ आणि आयुष्याची ‘डायरेक्टर’ म्हटलं जातं. मातृदिनाच्या निमित्ताने मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्रीांनी त्यांच्या आईबद्दलच्या भावना व्यक्त करत खास आठवणी शेअर केल्या आहेत.
‘कमळी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली विजया बाबर सांगते की, त्यांच्या घरी आजही प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. मुंबईत राहूनही गावाकडच्या परंपरा जपण्याचे संस्कार तिला आईकडून मिळाले. तिच्या मते, तिच्या स्वभावातील हट्टीपणा हा नकारात्मक नसून ध्येय गाठण्याची जिद्द आहे आणि ती आईचीच देण आहे. घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळत आईने शिवणकामाचा छंद जोपासलेला पाहून तिला नेहमीच प्रेरणा मिळाली. “देवाला प्रत्येक ठिकाणी पोहोचणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आई निर्माण केली,” असं म्हणत ती आईला घराची खरी सीईओ आणि संस्कारांची डायरेक्टर मानते.
‘सनई चौघडे’ मालिकेतील पमा म्हणजेच मेघना एरंडे जोशी यांच्या मते आई ही कुटुंबाचा आधार असते. आई झाल्यानंतर तिचं आयुष्य अधिक समृद्ध झालं असून मुलगी इरामुळे तिला स्वतःचं बालपण पुन्हा अनुभवायला मिळत आहे. ती सांगते की, आई झाल्यानंतर तिच्यातील बेजबाबदारपणा कमी झाला आणि ती अधिक समजूतदार व खंबीर झाली. मुलीला चांगुलपणाचे संस्कार देणं हीच तिच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असतानाही मुलीच्या अभ्यासापासून दिवसातील छोट्या गोष्टींपर्यंत ती सतत लक्ष देत असते.
‘शुभ श्रावणी’ मालिकेतील श्रावणी म्हणजेच वल्लरी विराज हिच्या मते, कोणतीही परिस्थिती आली तरी आपली तत्वं आणि स्वभाव कधीही सोडू नयेत, ही शिकवण तिला आईकडून मिळाली आहे. आईकडूनच तिला शिस्त, नियोजन आणि सातत्याचे गुण मिळाले, ज्याचा उपयोग तिला अभिनय क्षेत्रातील धावपळीत खूप होतो. लहानपणी मुलांच्या संगोपनासाठी आईने स्वतःचे छंद मागे ठेवले, पण आता ती पुन्हा आनंदाने बागकामात रमते, हे पाहून वल्लरीला खूप आनंद होतो. ती म्हणते, “आईशिवाय घराचं पानही हलत नाही, त्यामुळे तीच घराची खरी सीईओ आहे.”
‘तुला जपणार आहे’ मालिकेतील मीरा म्हणजेच महिमा म्हात्रे आपल्या कामातील निष्ठेचे आणि प्रोफेशनल राहण्याचे पूर्ण श्रेय आईला देते. घोडेस्वारीच्या सीनदरम्यान अपघात होऊनही केवळ १५ दिवसांत ती पुन्हा शूटिंगला परतली आणि हे धाडस तिला आईकडूनच मिळालं आहे. तिची आई गृहिणी असण्यासोबतच वडिलांच्या व्यवसायातही सक्रियपणे काम करते. घर आणि व्यवसाय यांचा समतोल कसा साधावा, हे शिकण्याची प्रेरणा महिमाला आईकडून मिळते. नुकताच साखरपुडा झाल्याने लग्नानंतर आईच्या हातचं जेवण खूप मिस करेन, असं ती भावुक होत सांगते.
आईने जपलेल्या परंपरा, संस्कार आणि मूल्यांचा वारसा या अभिनेत्री केवळ अभिनयातून नाही, तर त्यांच्या खऱ्या आयुष्यातूनही पुढे नेत आहेत. मातृदिनाच्या निमित्ताने सर्व मातांना आणि त्यांच्या अथक प्रेमाला मनापासून सलाम!