९ जून २०२५ रोजी “मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेचे” म्हणजेच मानाचि लेखक संघटनेचे पदाधिकारी – पुरुषोत्तम बेर्डे, राजीव जोशी, आशिष पाथरे, डॉ. अलका नाईक आणि विवेक आपटे – यांनी लेखकांच्या समस्यांबाबत माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची सदिच्छा भेट घेतली.
संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे यांनी लेखकांना भेडसावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या समस्या मांडल्या. त्या ऐकून मंत्री शेलार यांनी लेखकांवर होणारा अन्याय मान्य केला आणि चर्चा करून त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. “या समस्यांवर सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेतली जाईल,” असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रतिक्रियेबद्दल संघटनेचे आभार मानत अध्यक्ष विवेक आपटे यांनी सांगितले की, “मंत्रिमहोदयांनी आमच्या निवेदनावर सहाही मुद्द्यांवर सकारात्मक शेरा नोंदवला आहे.”
मानाचि लेखक संघटना ही मराठीतील हौशी व व्यावसायिक लेखकांची एक रजिस्टर संस्था आहे, जी २०१६ पासून मालिकेपासून चित्रपटापर्यंत विविध माध्यमांत कार्यरत कवी, गीतकार, संवादलेखकांसाठी सन्मान आणि सुरक्षिततेसाठी कार्य करत आहे. संवादातून प्रश्न सोडवून लेखकांना हक्काचा सन्मान व मानधन मिळावे यासाठी संघटना कटिबद्ध आहे.

संघटनेने पुढील सहा महत्त्वाच्या मागण्या मांडल्या:
१. शीर्षकावर लेखकाचा हक्क:
नाट्यसंहितेच्या परवानग्या दिल्या जातात, पण त्या नाटकांच्या शीर्षकांवर लेखकाचे नाव रजिस्टर होत नाही. परिणामी शीर्षके निर्मात्यांच्या नावावर जाऊन लेखकांना कोणताही लाभ मिळत नाही.
मागणी: शीर्षके लेखकाच्या नावावर रजिस्टर करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
२. शीर्षकांसाठी मूळ लेखकाला श्रेय व मानधन:
गाण्यांच्या, कवितांच्या ओळींपासून मालिका शीर्षके तयार होतात, पण मूळ लेखकाला नोंदही मिळत नाही.
मागणी: शीर्षकासाठी मूळ लेखकाचे नाव श्रेयनामावलीत यावे व एकरकमी मानधन द्यावे.
३. लेखकांसाठी कार्यालयीन व उपक्रमांच्या जागेची गरज: संघटनेच्या उपक्रमांसाठी स्थायी जागा नाही.
मागणी: पु. ल. देशपांडे अकॅडमी किंवा रवींद्र नाट्य मंदिरात विनामूल्य/अत्यल्प भाड्यात जागा द्यावी.
४. सेन्सॉर प्रमाणपत्रापूर्वी मानधनाची खात्री:
लेखक व गीतकारांनाही प्रमाणपत्र मिळाल्याचे व मानधन मिळाल्याचे NOC बंधनकारक करावे.
मागणी: लेखकाचे प्रमाणपत्र नसल्यास सेन्सॉर सर्टिफिकेट न देणे.
५. कॉपीराईट नोंदणीसाठी मुंबईत सुविधा:
सध्या ही नोंदणी फक्त दिल्लीमध्ये होते, जी लेखकांसाठी गैरसोयीची आहे.
मागणी: ही नोंदणी मुंबईतही करता यावी.
६. लेखकांसाठी विमा आणि पेन्शन योजना:
वृद्ध व अपंग लेखकांसाठी सन्मानपूर्वक मदतीची आवश्यकता.
मागणी: पात्र लेखकांची शासकीय योजनांसाठी तपासणी व शिफारस मानाचि संघटनेकडून करण्याची परवानगी मिळावी.
संघटनेच्या या ठाम, संयमी आणि अभ्यासू निवेदनामुळे अनेक लेखकांच्या हक्कांना हक्काचा आवाज मिळाला आहे. मंत्री शेलार यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आता या मागण्यांवर कृतीची अपेक्षा आहे.
लेखकांच्या कल्याणासाठी पुढाकार घेणाऱ्या मानाचि संघटनेच्या प्रयत्नांना यश मिळो, हीच अपेक्षा.