भारतीय मनोरंजन विश्वातून एक अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या ‘जिओ स्टुडिओज’ (Jio Studios) ने ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा कपूर यांच्या ‘सिख्या एंटरटेनमेंट’ (Sikhya Entertainment) मधील ५०.१% हिस्सा खरेदी केला आहे. हा व्यवहार १५० कोटी रुपयांना झाला असून, यामुळे आता भारतीय मातीतील कथा जागतिक स्तरावर अधिक ताकदीने पोहोचणार आहेत.
काय आहे हा करार?
रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेडने ३ फेब्रुवारी २०२६ रोजी या करारावर शिक्कामोर्तब केले. ‘सिख्या एंटरटेनमेंट’ ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित प्रोडक्शन हाऊसपैकी एक आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ आणि ‘पिरियड. एंड ऑफ सेंटेन्स’ सारख्या माहितीपटांसाठी ऑस्कर जिंकण्याचा मान या संस्थेला मिळाला आहे. आता जिओ स्टुडिओजच्या सोबतीने सिख्या एंटरटेनमेंट भारतीय आणि जागतिक प्रेक्षकांसाठी नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीजची निर्मिती करणार आहे.
‘धुरंधर’ ते ‘स्त्री २’ पर्यंतचा प्रवास
जिओ स्टुडिओजने गेल्या काही वर्षात ‘धुरंधर’, ‘लापता लेडीज’ आणि ‘स्त्री’ सारखे सुपरहिट चित्रपट देऊन बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. दुसरीकडे, सिख्या एंटरटेनमेंटने ‘मसान’, ‘लंचबॉक्स’, ‘सोरारई पोट्रू’ आणि ‘किल’ सारख्या सिनेमांतून जगाला भारतीय सिनेमाची ताकद दाखवून दिली आहे.
ज्योती देशपांडे (प्रेसिडेंट – जिओ स्टुडिओज) काय म्हणाल्या?
या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करताना ज्योती देशपांडे म्हणाल्या, “सिख्या एंटरटेनमेंटने नेहमीच अशा कथा मांडल्या आहेत ज्या भारतीय असूनही जागतिक स्तरावर मनाला भिडतात. गुनीत मोंगा यांच्या कामाचा मला आदर आहे. जिओ स्टुडिओजचे वितरण जाळे आणि सिख्याची कथा सांगण्याची हातोटी एकत्र आल्यास भारतीय सिनेमा जागतिक नकाशावर नवीन उंची गाठेल.”
गुनीत मोंगा यांचा विश्वास
गुनीत मोंगा आणि अचिन जैन यांनी सांगितले की, “जिओ स्टुडिओजसोबतची ही भागीदारी आम्हाला देशातील नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्यास आणि भारतीय संस्कृतीतील अनोख्या कथा जगासमोर नेण्यास मदत करेल. ज्योती देशपांडे यांची कल्पकता आणि धाडसी निर्णय घेण्याची वृत्ती या भागीदारीला अधिक खास बनवते.”