पंढरपूरची ‘वारी’ हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी भक्ती, उत्साह आणि आनंदाचा महोत्सव आहे. दरवर्षी लाखो भाविकांना ऊर्जा देणारा हा सोहळा आता मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. नुकताच ‘वारी’ या मराठी चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला.
‘वारी’ या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांचा सहभाग असून, अभिनेता प्रसाद ओक, वैभव मांगले, गणेश यादव, प्रणव रावराणे यांच्या दमदार अभिनयाची साथ प्रेक्षकांना लाभणार आहे.
वारी म्हणजे फक्त पंढरीच्या विठ्ठलाची ओढ नाही, तर तो एक जीवन समृद्ध करणारा अनुभव आहे. पंढरपूरच्या दिशेने निघालेला हा प्रवास केवळ गाभाऱ्यातील दर्शनापुरता मर्यादित नसून, पायी वारीतून होणारी वाटचाल ही भक्तांसाठी खऱ्या आनंदाचा ठेवा असते. वारकऱ्यांची ही शाश्वत परंपरा आणि मराठी मातीच्या सांस्कृतिक ठेव्याचा महिमा ‘वारी’ चित्रपटातून उलगडला जाणार आहे.
वारीत केवळ अध्यात्म नाही, तर व्यवस्थापन, लोककला, संगीत, संस्कृती आणि मानवी भावनांचा अनोखा संगम आहे. म्हणूनच वारीला शिक्षणाचं लोकपीठ म्हटलं जातं. “वारीला प्रत्यक्ष जाऊनच ती समजते, वाचून किंवा ऐकून नव्हे! आणि आता आम्हीही हा अनुभव चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणार आहोत,” असे कलाकारांनी या प्रसंगी उत्साहाने सांगितले.
राज फिल्म्स अँड डिस्ट्रीब्युशन प्रस्तुत ‘वारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले असून, निर्मिती राजेश सावळाराम पाटील यांची आहे. कथा मनोज येरुणकर यांची असून, पटकथा आणि संवाद मच्छिंद्र बुगडे यांनी लिहिले आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे, तर कार्यकारी निर्माता म्हणून महेश चाबुकस्वार यांची भूमिका आहे.
‘वारी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता जोरदार सुरुवात झाली आहे, आणि लवकरच हा भक्तिमय प्रवास प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.