Home » मराठी सिनेमाचा ऑस्करमध्ये डंका! ‘दशावतार’ची 2026 च्या ऑस्करच्या मुख्य शर्यतीत ऐतिहासिक झेप

मराठी सिनेमाचा ऑस्करमध्ये डंका! ‘दशावतार’ची 2026 च्या ऑस्करच्या मुख्य शर्यतीत ऐतिहासिक झेप

Dashavatar Shortlisted for Oscars 2026 : मराठी सिनेमासाठी जागतिक स्तरावर गौरवाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांचा बहुचर्चित चित्रपट दशावतार हा 2026 च्या ऑस्कर (Academy Awards) स्पर्धेच्या Main Open Film Category – Contention List मध्ये अधिकृतपणे सामील झाला आहे. विशेष म्हणजे, मुख्य शर्यतीत स्थान मिळवणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.

जगभरातील हजारो सिनेमांमधून निवडल्या गेलेल्या अवघ्या 150 हून अधिक चित्रपटांच्या यादीत ‘दशावतार’ने आपले नाव कोरले असून, अकॅडमी स्क्रीनिंग रूममध्ये दाखवला जाणारा तो पहिलाच मराठी सिनेमा ठरला आहे. ही केवळ एका चित्रपटाची नाही, तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी निर्माते सुजय यांना आलेल्या अधिकृत संदेशाचा स्क्रीनशॉट शेअर करत, “अकॅडमी स्क्रीनिंग रूममध्ये आता ‘दशावतार’ लाईव्ह असेल”, असा संदेश मिळाल्याचे सांगितले. सुबोध यांच्या मते, हा क्षण मराठी सिनेमा जागतिक दर्जाच्या कलाकृतींना सक्षमपणे टक्कर देऊ शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारा आहे. “कष्ट, प्रामाणिकपणा आणि मोठी स्वप्न पाहण्याचे आज चीज झाले,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ने बॉक्स ऑफिसवरही दमदार कामगिरी केली होती. मराठी प्रेक्षकांसह अमराठी प्रेक्षकांनीही या सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळेच हा सिनेमा पुढे मल्याळम भाषेतही प्रदर्शित करण्यात आला. अकॅडमी स्क्रीनिंग रूमपर्यंत पोहोचणे ही या चित्रपटाच्या टीमने घेतलेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीची पोचपावती मानली जात आहे.

या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी ‘बाबुली मेस्त्री’ या दशावतार कलाकाराची मध्यवर्ती भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. त्यांच्यासोबत महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, रवी काळे, विजय केंकरे, सुनील तावडे आणि आरती वडगबाळकर यांसारखे अनेक नामवंत कलाकार या चित्रपटात झळकले आहेत. कोकणातील स्थानिक कलाकारांनीही या कलाप्रकाराला जागतिक ओळख मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

जिंकणे किंवा हरणे ही पुढील बाब असली, तरी ऑस्करसारख्या जागतिक व्यासपीठावर मराठी सिनेमाची दखल घेतली जाणे ही एक आश्वासक आणि ऐतिहासिक सुरुवात मानली जात आहे. ‘दशावतार’च्या या जागतिक झेपमुळे सध्या सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा ठरत आहे.

=====

हे देखील वाचा : प्रियदर्शिनी इंदलकर – अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी झळकणार ‘लग्नाचा शॉट’मध्ये

=====

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy