सध्या चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेला मराठी चित्रपट ‘दशावतार’ १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या भव्य चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांसारख्या दिग्गज कलाकारांचा बहारदार अभिनय पाहायला मिळणार आहे.
पोस्टर आणि टीझरने आधीच प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच चाळवली असताना, आता प्रदर्शित झालेलं पहिलं गाणं ‘आवशीचो घो’ कोकणच्या मातीचा सुगंध आणि मालवणी भाषेची गोडी घेऊन आलं आहे. अनेकांना हा शब्द शिवी वाटू शकतो, पण तो खरं तर लाडाचा, प्रेमाने वापरला जाणारा शब्द आहे. मालवणीत ‘आवशी’ म्हणजे आई आणि ‘घो’ म्हणजे नवरा. त्यामुळे आईच्या नवऱ्याला म्हणजेच वडिलांना प्रेमाने “आवशीचो घो” म्हणतात. या गाण्यात बाप-मुलाच्या नात्यातील हसरे आणि हळवे दोन्ही रंग खुलून दिसतात.
दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्या जोडीवर चित्रित हे गाणं वरवर खट्याळ, मिश्किल वाटत असलं तरी, आतून ते वडील-मुलाच्या नात्याचं सार मांडतं. कधी मुलगा वडिलांची काळजी घेणारा ‘वडील’ बनतो, तर कधी वडील त्याचे ‘मूल’ होतात – ही या नात्याची गंमत या गीतातून खुलते. गीतकार गुरु ठाकूर यांनी या गाण्याला शब्द दिलेत, संगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं असून, ओंकारस्वरुप यांनी ते भावपूर्ण गायलं आहे.
गुरु ठाकूर सांगतात, “बाप-मुलाच्या मैत्रीचं नातं खट्याळ अंदाजात मांडणारं गाणं याआधी कधी झालं नव्हतं. ‘आवशीचो घो’ लिहिणं हा वेगळाच अनुभव होता. मालवणी बोली, मधुर संगीत आणि दिलीपजी-सिद्धार्थची कमाल केमिस्ट्री या गाण्याला एक आगळंवेगळं रूप देतात.”
लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांच्या मते, “हे गाणं वडील-मुलामधील नात्यातलं प्रेम, ताण, गैरसमज, जबाबदाऱ्या आणि त्यातले बदल हसत-खेळत उलगडतं. पडद्यावर दिलीपजी आणि सिद्धार्थची जुगलबंदी ते नातं अफलातून जिवंत करते.”
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “‘दशावतार’ हा भावनिक आणि कलात्मक अनुभव देणारा चित्रपट आहे. ‘आवशीचो घो’ हे गाणं या प्रवासातील हृदयाला भिडणारं टप्पं आहे, जे सर्व वयोगटांना रिलेट होईल.”
निर्माते सुजय हांडे सांगतात, “हे गाणं फक्त मजा देणारं नाही, तर नात्यांचा गाभा उलगडणारं आहे. दिलीपजी आणि सिद्धार्थ यांनी याला वेगळ्याच उंचीवर नेलं आहे.”
टीझरनंतर आता ‘आवशीचो घो’ने ‘दशावतार’ची भावनिक बाजूही समोर आणली आहे. हसवत-हसवत डोळ्यांत पाणी आणणारं, आणि प्रत्येकाला आपल्या वडिलांची आठवण करून देणारं हे गाणं प्रेक्षकांच्या मनात नक्की घर करेल.