Home » निता अंबानींच्या वाढदिवशी कर्जतमध्ये १०० एकरांच्या ‘अनंत आश्रय’ प्रकल्पाची पायाभरणी

निता अंबानींच्या वाढदिवशी कर्जतमध्ये १०० एकरांच्या ‘अनंत आश्रय’ प्रकल्पाची पायाभरणी

अनाथ मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी उभारणार ५ हजारांहून अधिक रहिवाशांचं नवं घर

रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत महाराष्ट्रातील कर्जत येथे एका महत्त्वाकांक्षी सामाजिक प्रकल्पाची सुरुवात केली आहे. १ नोव्हेंबर रोजी त्यांनी ‘नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय’ या प्रस्तावित प्रकल्पाचं भूमिपूजन आणि पायाभरणी केली. सुमारे १०० एकर परिसरात उभारण्यात येणाऱ्या या टाउनशिपमध्ये ५ हजारांहून अधिक गरजू व्यक्तींना आयुष्यभरासाठी घर, वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक देखभाल मिळणार आहे.

या प्रकल्पाचा लाभ अनाथ मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि विकासात्मक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना मिळणार आहे. या रहिवाशांसोबतच त्यांची काळजी घेणारे कर्मचारी, वैद्यकीय तज्ज्ञ आणि त्यांच्या कुटुंबीयांमुळे या संपूर्ण प्रकल्पाशी सुमारे १५ हजार लोक जोडले जाण्याची अपेक्षा आहे. नीता अंबानी यांच्यासोबत त्यांची कन्या आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संचालिका ईशा अंबानी यांनीही या भूमिपूजन सोहळ्यात सहभाग घेतला.

nita-ambani-isha-ambani-anant-ashray.jpg

संस्थात्मक निवासाऐवजी कुटुंबासारखं वातावरण

‘अनंत आश्रय’ हा केवळ निवासाची सोय उपलब्ध करून देणारा प्रकल्प नसून, रहिवाशांना कुटुंबासारखं वातावरण देण्याचा प्रयत्न असणार आहे. येथे मोठ्या संस्थांप्रमाणे एकत्रित निवासाची व्यवस्था नसेल. त्याऐवजी छोट्या घरांमध्ये रहिवासी राहतील. प्रत्येक घरासाठी विशेष काळजी घेणारे कर्मचारी आणि पालकांची भूमिका निभावणारे हाऊस पॅरेंट्स असतील.

या प्रकल्पाबद्दल बोलताना नीता अंबानी यांनी सांगितलं की, वैद्यकीय सुविधा आणि प्रेमळ कौटुंबिक वातावरण यांची सांगड घालणारं एक समुदायविश्व उभारण्याची त्यांची संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागचा मुख्य विचार आहे.

आठ निवासी गावं, रुग्णालय आणि पुनर्वसन केंद्र

या टाउनशिपमध्ये आठ निवासी गावं विकसित केली जाणार आहेत. भारतातील पवित्र नद्यांची नावं या गावांना दिली जाणार आहेत. आरोग्य आणि विशेष गरजा लक्षात घेऊन येथे रुग्णालय, पुनर्वसन केंद्र, विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी दंतोपचार, एपिलेप्सी उपचार आणि पॅलिएटिव्ह केअर अशा सुविधा प्रस्तावित आहेत.

याशिवाय फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी आणि हायड्रोथेरपीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. रहिवाशांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधींकडेही लक्ष दिलं जाणार आहे.

बागा, शेती, खेळ आणि प्राण्यांसोबत वेळ घालवण्याचीही संधी

या प्रकल्पात केवळ वैद्यकीय आणि निवासी सुविधाच नव्हे, तर आनंदी जीवनासाठी आवश्यक गोष्टींचाही समावेश असेल. टाउनशिपमध्ये मंदिर, बागा, शेती, खेळाची मैदानं, वर्कशॉप्स, कॅफे आणि मनोरंजनासाठी विविध सुविधा उभारण्याची योजना आहे.

विशेष म्हणजे, प्राण्यांसोबत वेळ घालवता यावा यासाठी एक स्वतंत्र अॅनिमल कम्पॅनियनशिप फार्मही विकसित केला जाणार आहे. या उपक्रमासाठी वनतारा (Vantara) येथील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.

जवळच्या गावांतील नागरिकांनाही मिळणार लाभ

‘अनंत आश्रय’चा फायदा केवळ टाउनशिपमधील रहिवाशांपुरता मर्यादित राहणार नाही. परिसरातील जवळपास १ हजार नागरिकांनाही थेरपी, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. याशिवाय मोबाइल मेडिकल क्लिनिक, तात्पुरत्या निवासाची सुविधा आणि विविध जनजागृती व मदत उपक्रमांच्या माध्यमातून आसपासच्या जिल्ह्यांतील कुटुंबांपर्यंतही मदत पोहोचवली जाणार आहे.

प्रत्येक रहिवाशासाठी त्यांच्या गरजेनुसार स्वतंत्र केअर आणि डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला जाणार आहे. त्यात आरोग्य, शिक्षण, कौशल्य, रोजगार आणि वैयक्तिक विकासाचा समावेश असेल. रहिवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून या योजनांचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे.

नीता अंबानी यांनी या प्रकल्पामागील भावना व्यक्त करताना सांगितलं की, ज्या पालकांना आपल्या पश्चात मुलांची काळजी कोण घेणार, याची चिंता असते, त्यांना या उपक्रमामुळे दिलासा मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर सन्मानाने जगता यावं, हाच ‘अनंत आश्रय’चा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हा प्रकल्प आवश्यक परवानग्यांच्या अधीन राहून टप्प्याटप्प्याने विकसित केला जाणार आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy