मराठी सिनेमात ऐतिहासिक भव्यतेचा विषय आला की मोठ्या अपेक्षा आपोआप निर्माण होतात. राजा शिवाजी हा सिनेमा त्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. पण पूर्णपणे खिळवून ठेवण्यात मात्र थोडा कमी पडतो. (Raja shivaji Review)
रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर प्रकाश टाकतो. स्वराज्याच्या उभारणीपासून अफझल खानाशी झालेल्या ऐतिहासिक वधापर्यंतचा प्रवास.
सिनेमा सुरुवातीपासूनच त्याच्या भव्यतेने लक्ष वेधून घेतो. सेट्स, वेशभूषा, युद्धदृश्यं आणि स्केल सगळं काही मोठ्या कॅनव्हासवर उभं राहतं. पण कथा जसजशी पुढे सरकते, तसतसा तिचा वेग आणि फोकस थोडा विस्कळीत वाटू लागतो.
पहिल्या भागात अनेक घटनांचा भरणा असल्यामुळे भावनिक पकड तितकी मजबूत होत नाही. कथा माहितीपूर्ण वाटते, पण सिनेमॅटिक थरार कमी जाणवतो. दुसऱ्या भागात मात्र अफझल खान (संजय दत्त) आणि शिवाजी महाराज यांच्यातील संघर्षामुळे कथेला गती येते आणि शेवटचा भाग अधिक प्रभावी ठरतो.
लेखनाच्या बाबतीत, अनेक ठिकाणी दमदार आणि टाळ्या मिळवणारे प्रसंग आहेत, पण एकूणच पटकथा थोडी घट्ट असती तर परिणाम अजून चांगला झाला असता. जवळपास तीन तासांच्या लांबीमुळे काही ठिकाणी प्रेक्षकांचा उत्साह कमी होतो.
सिनेमाचं एक मोठं बलस्थान म्हणजे त्याची भूमिका मांडण्याची पद्धत. हा सिनेमा शिवाजी महाराजांना सुपरहिरो म्हणून न दाखवता, एक माणूस — पुत्र, पती, राजा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काही प्रसंग अधिक वास्तववादी वाटतात.
अभिनयाच्या बाबतीत, रितेश यांनी संयम आणि तीव्रता यांचा समतोल साधत भूमिका साकारली आहे. जेनेलिया सईबाईच्या भूमिकेत साधेपणाने लक्षात राहतात. संजय दत्त अफझल खानच्या भूमिकेत प्रभाव टाकतो, तर अभिषेक बच्चन, विद्या बालन आणि इतर कलाकारही आपापली भूमिका चांगल्या प्रकारे निभावतात.
तांत्रिक बाजू मजबूत आहे. विशेषतः छायांकन आणि प्रॉडक्शन डिझाइन सिनेमाला मोठेपणा देतात. अजय-अतुलचं संगीत काही ठिकाणी भावतं, पण बॅकग्राउंड स्कोर आणि एडिटिंग अधिक चांगलं असत तर अनुभव अजून प्रभावी झाला असता.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा सिनेमा अतिनाट्यमय किंवा आक्रमक मांडणी न करता थोड्या संयमाने कथा सांगतो. काहींसाठी हे प्लस पॉइंट ठरू शकतं, तर काहींना यात थोडी कमी एनर्जी जाणवू शकते.
एकूणच, ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा भव्य आहे, प्रामाणिक आहे आणि आदर वाटायला लावतो. पण तो पूर्णपणे भावनिक किंवा थरारक अनुभव देण्यात सातत्य राखत नाही. काही क्षण खूप उंची गाठतात. विशेषतः क्लायमॅक्स पण संपूर्ण प्रवास तितकाच प्रभावी राहत नाही.
सिनेमा: राजा शिवाजी (Raja Shivaji)
निर्माता: Jio Studios, Mumbai Film Company
दिग्दर्शक: रितेश देशमुख
कलाकार: रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, भाग्यश्री, सलमान खान
संगीत: अजय-अतुल
छायांकन: संतोष सिवन
दर्जा: ⭐⭐⭐☆☆
=====
हे देखील वाचा: ‘Ek Din’ Review: मनाला स्पर्श करणारा आणि साधेपणातली सुंदरता जपणारा सिनेमा
=====