नवनवीन विषय, फ्रेश आशय आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडी लक्षात घेत झी स्टुडिओज सातत्याने मराठी सिनेसृष्टीत वेगळे प्रयोग सादर करत आहे. सामाजिक आशयघन कथा, कौटुंबिक भावविश्व आणि मनोरंजनप्रधान चित्रपटांनंतर आता झी स्टुडिओज एक स्टायलिश आणि रुबाबदार लव्हस्टोरी घेऊन येत आहे — ‘रुबाब’.
‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा धडाकेबाज टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्याच झलकेत चित्रपटाची स्टाईल, स्वॅग आणि प्रेमाची वेगळी मांडणी दिसून येते. ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही टॅगलाईन प्रेक्षकांच्या मनात थेट घर करते.
टीझरमध्ये एका डॅशिंग, स्वतःचे नियम स्वतः ठरवणाऱ्या रुबाबदार नायकाची आणि त्याच्या ड्रीम गर्लची गोष्ट उलगडते. ही केवळ गोडगुलाबी प्रेमकहाणी नाही, तर प्रेमासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेल्या तरुणाची कथा आहे. स्टाईल, भावना आणि अॅटिट्यूड यांचा समतोल साधत ‘रुबाब’ तरुणाईला खास भावणारा चित्रपट ठरणार असल्याचं टीझरमधून स्पष्ट होतं.
दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात,
“‘रुबाब’ हा स्वतःचा ठाम आवाज असलेल्या तरुणाईचा चित्रपट आहे. आजचं प्रेम प्रामाणिक असतं, पण त्यात एक स्वॅग असतो. तोच रुबाब आम्ही या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.”
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जनावलेकर यांच्या मते,
“मराठी प्रेक्षकांना नेहमीच फ्रेश आणि स्टायलिश आशय हवा असतो. ‘रुबाब’ ही केवळ रोमँटिक लव्हस्टोरी नाही, तर प्रेमासाठी उभं राहण्याची, स्वतःच्या तत्वांवर जगण्याची आणि भावना निर्भीडपणे व्यक्त करण्याची कथा आहे.”
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केलं आहे. संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जनावलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.
स्टाईल, प्रेम आणि रुबाब यांचा हटके अनुभव देणारा ‘रुबाब’ येत्या ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
=====
हे देखील वाचा : ‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा धमाल करायला सज्ज; ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीला चित्रपटगृहात
=====