WAVES 2025 In Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (१ मे) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे म्हणजेच ‘WAVES’ चे उद्घाटन पार पडले. ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ या संकल्पनेवर आधारित ही चार दिवसांची परिषद भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाच्या जागतिक मंचावर अधोरेखित करणार आहे.
भारताच्या पहिल्या ‘जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (Waves) आयोजन महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. ‘WAVES 2025’ मध्ये जगभरातील ९० पेक्षा अधिक देश सहभागी झाले असून, ही परिषद मनोरंजन क्षेत्रातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड मानली जात आहे.
या भव्य परिषदेसाठी आतापर्यंत एक लाखांहून अधिक नोंदणी झाल्याची माहिती आहे. WAVES 2025 मध्ये ९० देश, १०००० प्रतिनिधी, १००० कलाकार, ३०० पेक्षा अधिक नामांकित कंपन्या आणि ३५० हून अधिक स्टार्टअप्स सहभागी होत आहेत. या चार दिवसीय कार्यक्रमात एकूण ४२ मुख्य सत्रे, ३९ विशेष सत्रे आणि ३२ मास्टर क्लासेस आयोजित करण्यात येणार असून, ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेन्मेंट, एव्हीजीसी-एक्सआर, चित्रपट व डिजिटल मीडियासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
ही परिषद केवळ एक इव्हेंट नसून, भारताच्या जागतिक मीडिया सहभागाचा ऐतिहासिक टप्पा म्हणून पाहिली जात आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘क्रिप्टोस्पियर’मध्ये भेट देऊन ‘क्रिएट इन इंडिया’ या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या प्रतिभावंत कलाकारांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर ते भारत पॅव्हिलियन व महाराष्ट्र पॅव्हिलियनलाही भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.