एजेला लीलाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे, आणि तो त्या शक्य तितक्या अनोख्या पद्धतीने पूर्ण करणार आहे. लीलाला एका फिल्मी स्टाईल प्रपोजलची इच्छा आहे—अगदी जिमी शेरगीलने रिश्ते चित्रपटात ट्रेनच्या लेडीज डब्यात चढून केल्यासारखं! लीलाचं म्हणणं आहे की, जसं त्यांचं नातं खास आहे, तसंच हे प्रपोजलही हटके असायला हवं. खरं प्रेम अशाच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करतं. तिची आणखी एक इच्छा म्हणजे, एका थंड, बर्फाच्छादित ठिकाणी जाऊन रोमँटिक डान्स करायचा आणि त्यानंतर एक सुंदर शिकारा राईडही अनुभवायची. आणि या सगळ्या गोष्टींसाठी एजे पूर्णपणे तयार आहे—कारण तो आता मनापासून लीलाच्या प्रेमात पडला आहे!
या खास प्रसंगाच्या शूटिंगबद्दल वल्लरी विराज हिने तिचा अनुभव शेअर केला. “आम्ही चार दिवस काश्मीरमध्ये शूटिंग केलं. बर्फाच्या पांढऱ्याशुभ्र चादरीने नटलेल्या गुलमर्ग आणि श्रीनगरमध्ये आम्ही विविध दृश्यं टिपली. तिथे शूट करणं सोपं नव्हतं—थंडी खूप तीव्र होती. पण बर्फात शूट करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. गुलमर्गमध्ये आम्ही एजे-लीलाच्या प्रपोजल सीनचं शूटिंग केलं. तिथे बर्फात साडी नेसून गाणं चित्रीत करणं माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. अक्षरशः गारठून गेली होते! सीन कट होताच आमचं युनिट मला पटकन जॅकेट देत होतं. विशेषतः ‘नवरी मिळे हिटलरला’च्या क्रिएटिव्ह टीममधील मनालीने माझी खूप काळजी घेतली. एजे म्हणजेच राकेश बापट यानेही मला खूप सपोर्ट केला. पण जेव्हा हा सीन स्क्रीनवर पाहिला, तेव्हा मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आम्ही डल लेकमध्ये शिकाऱ्यावरही शूटिंग केलं, आणि तो अनुभवही अप्रतिम होता. हे सगळं प्रेक्षकांना पाहताना नक्कीच एक वेगळी अनुभूती मिळेल. काश्मीरमध्ये शूटिंगचा हा अनुभव मी कधीच विसरणार नाही!”
तेव्हा पाहायला विसरू नका! ‘नवरी मिळे हिटलरला’ दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर!