टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभातील धमाल आणि मजा नंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या निमित्ताने सर्वांसोबत सादर झाले आहे. हा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला, ज्यामध्ये दाभाडे कुटुंबाने ट्रॅक्टरमधून जबरदस्त एंट्री केली आणि सर्वांसोबत धमाल केली. यावेळी क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे, तृप्ती शेडगे, दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि दाभाडे कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते.
![](https://masalamanoranjan.com/wp-content/uploads/2025/01/image.jpg)
हेमंत ढोमे यांचा चित्रपट म्हणजे धमाल आणि मजा यांचा संगम! कौटुंबिक विषय हलक्याफुलक्या, मजेदार आणि प्रभावी पद्धतीने मांडण्याचे त्यांचे खास मार्गदर्शन आहे. ‘फसक्लास दाभाडे’ हा त्यांचा एक उत्कृष्ट प्रयोग आहे. या चित्रपटाची घोषणा होण्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती, आणि ट्रेलरने त्यात भर टाकली आहे. ट्रेलरमध्ये दाभाडे कुटुंबातील सदस्यांची आंबट-गोड केमिस्ट्री, सोनू, तायडी आणि पप्पू यांच्यातील मजेदार नोकझोक, आणि त्यांच्यातील भावनिक नातं दाखवण्यात आले आहे. हास्य आणि हृदयस्पर्शी भावनांचा अनोखा संगम असलेल्या या कुटुंबाची कथा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
चित्रपटाबद्दल निर्माते भूषण कुमार म्हणतात, “हेमंत ढोमे यांच्याकडून नेहमीच दर्जेदार आणि सुपरहिट चित्रपट मिळाले आहेत. त्यांचे चित्रपट प्रेक्षकांची कथा आणि भावनांशी जोडतात. ‘फसक्लास दाभाडे’मधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना त्यांच्या घरातील किंवा आजूबाजूच्या जीवनाशी जोडून दिसेल. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक उत्तम अंदाज निर्माण केला आहे आणि चित्रपट देखील तितकाच धमाकेदार असेल, हे यावरून स्पष्ट आहे.”
![](https://masalamanoranjan.com/wp-content/uploads/2025/01/image-1.jpg)
निर्माते आनंद एल राय म्हणतात, “या चित्रपटात नात्यांच्या गुंफणी आणि संघर्षाला हलक्याफुलक्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्हाला खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकून घेईल. ‘फसक्लास दाभाडे’चा अनुभव मनापासून काम करणाऱ्या कलाकारांची जादू आहे, जी पडद्यावर झळकते. आम्हाला विश्वास आहे की नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रेक्षकांना आनंद देईल.”
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “हा चित्रपट माझ्या गावात आणि मातीत शूट झाल्यामुळे माझ्यासाठी विशेष आहे. आपल्या गावात चित्रपट शूट करणे हे माझे स्वप्न होते आणि ‘फसक्लास दाभाडे’च्या माध्यमातून ते पूर्ण झाले. या चित्रपटात भावंडांची मस्ती, कुटुंबाचं प्रेम, आणि दाभाडे कुटुंबाची कथा प्रेक्षकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडेल. चित्रपट प्रेक्षकांना आनंद देणारा आणि भावनिकपणे समृद्ध करणारा असेल.”
‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होईल. हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओज करत आहे.