कोकणातले लोक म्हणजे शहाळ्यासारखे, बाहेरून कडक तर आतून मृदू आणि गोड. कोकणातील एक प्रथा आहे जेथे एखादे चांगले कार्य सुरु करताना देवाला साकडं घालण्याची. ते कार्य सुकर होवो म्हणताना इतर मंडळी त्यास दुजोरा देत म्हणतात, ‘होय महाराजा’. नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘होय महाराजा’ हा कोकणात जरी घडत नसला तरी त्याला मालवण चा फ्लेवर आहे. कोकणातून मुंबईत नोकरी शोधायला आलेल्या एका तरुणाची ही गोष्ट असून परिस्थितीमुळे तो कसा व का क्राईम च्या जंजाळात ओढला जातो यावर चित्रपटाचं कथानक बेतलेलं आहे. हा एक करमणूकप्रधान विनोदी चित्रपट असून त्यात क्राईमकथा आणि एक प्रेमकथाही उत्तमरीत्या गुंफण्यात आली आहे.
रमेश (प्रथमेश परब) (रम्या) हा तरुण कोकणातून मुंबईत एका नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी येतो. त्याचा मामा (अभिजित चव्हाण) जो मुंबईत वास्तव्यास असतो त्याच्याकडे तो राहू लागतो. त्याला मॅनेजर ची नाही तर चपराशी म्हणून नोकरी लागते. तेथे त्याचा गुजराती बॉस (समीर चौघुले) त्याच्यावर खार खात असतो आणि एका चुकीमुळे त्याची नोकरी जाते. त्याच्या मामाने उधारी चढविल्यामुळे रशीद भाई (संदीप पाठक) त्याच्यापाठी लागलेला असतो. मधल्या काळात रम्या आयेशा नावाच्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडतो परंतु त्याच्या काही कृत्यांमुळे तो गुन्हेगारीच्या वर्तुळात ओढला जातो. मामाने रशीद भाईची उधारी न चुकविल्यामुळे तो आयेशाला किडनॅप करतो. त्याचा मोठा बॉस अण्णा (वैभव मांगले) रशीद आणि राम्या वर नाराज होतो आणि आयेशा, रशीदची प्रेयसी सानिया (सानिका काशीकर) मामाची आवडती शेजारीण (नेहा वझे परांजपे) यांना ताब्यात घेतो. त्यांच्या सुटकेसाठी तो त्या सर्वांना गैरकानूनी कृत्य करण्यास भाग पाडतो. हे सर्व कसे घडते यावर चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे.
होय महाराजा ही एक क्राईम-कॅामेडी आहे. हा जॉनर सोपा वाटत असला तरी थ्रिलर आणि विनोद यांचे मिश्रण करणे हे खूप कठीण काम आहे. लोकांना घाबरावयाला लावणे हे तसे कठीण काम परंतु त्यांना हसवायला लावणे हे त्याहूनही कठीण काम. परंतु दिग्दर्शक शैलेश एल. एस. शेट्टी यांनी ही तारेवरची कसरत उत्तमरीत्या पूर्ण केली आहे. उत्तरार्धात खूप गोष्टी वेगाने घडत असल्यामुळे थोडा गोंधळ उडतो. यातील वन लायनर्स नक्कीच हशे वसूल करणाऱ्या आहेत. संगीत प्रासंगिक असून छायाचित्रण उत्तम झाले आहे. प्रथमेश परब ची आपली विनोदाची वेगळी स्टाईल आहे आणि त्याने उत्तम काम केले आहे. त्याने विनोदी प्रसंगांबरोबर प्रेमप्रसंगांमध्येही बाजी मारली आहे. त्याला अंकिता लांडे ने उत्तम साथ दिली आहे. अंकिता चा स्क्रीन प्रेसेन्ज जबरदस्त असून तिने अभिनयही दमदार केला आहे. अप्रतिम कॉमिक टायमिंग मुळे अभिजित चव्हाण भाव खाऊन जातो. संदीप पाठक ने आपल्या व्यक्तिरेखेला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्याच्या भूमिकेवरील सयाजी शिंदे चा पगडा ओव्हर ऍक्टिंग कडे झुकतो. समीर चौघुलेचा बॉस आणि वैभव मांगले चा अण्णा ठीकठाक.
होय महाराजा मधील कॉमेडीचा बहर व क्राईमचा कहर मनोरंजन करतो.
***१/२
कीर्तिकुमार कदम.