डिंम्पल गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रीती झिंटा पुन्हा मोठ्या पडद्यावर आपली जादू चालवणार आहे. तब्बल १७ वर्षाच्या दुराव्यानंतर प्रीती पुन्हा पडद्यावर झळकणार आहे. लाहोर १९४७ या चित्रपटात प्रीती सन्नी देओलसह दिसणार आहे. अभिनेता आमिर खान देखील या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आमिर खान, सनी देओल आणि प्रीती झिंटा या त्रिकुटाला एकत्र पहाण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या या चित्रपटाचे शुटींग सुरु झाले असून त्यासाठी अमेरिकेत आपल्या मुलांसह रहात असलेली प्रीती सध्या मुंबईत आली आहे.
१९९८ मध्ये दिल से या चित्रपटातून प्रीती झिंटा नावाची अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आली. पहिल्याच चित्रपटात प्रीतीनं शहारुख खानसोबत काम केलं. दिल से मधील जिया जले जान जले, हे तिचे पहिलेच गाणेही हिट ठरले. तिच्या गालावरच्या खळीनं तिला डिंम्पल गर्ल हे नाव मिळाले. वास्तविक ‘क्या कहना’ हा प्रीती झिंटाचा पहिला चित्रपट होता. पण हा चित्रपट तब्बल दोन वर्ष रखडला आणि २००० साली प्रदर्शित झाला. त्यामुळे १९९८ साली प्रदर्शित झालेला ‘दिल से’ हा चित्रपट प्रीतीचा बॉलिवूड पदापर्णाचा हिट चित्रपट ठरला. त्यानंतर प्रीती झिंटा सोल्जर, संघर्ष,दिल्लगी, दिल चाहता है, दिल है तुम्हारा, कल हो ना हो, कोई मिल गया, लक्ष, सलाम नमस्ते, वीर झारा या चित्रपटामधून बॉलिवूडच्या नंबर रेसमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली. हिंदीसोबत तिने तेलुगु, पंजाबी चित्रपटांतही काम केलं. बिझनेस टायकून नेस वाडियासोबत तिचे अफेअर गाजले. अगदी लग्नापर्यंत आलेले हे नाते पाच वर्षानंतर अचानक दुरावले. २०१६ साली प्रीती झिंटाने तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन जीन गुडइनफशी लग्नगाठ बांधली. जीन गुडइनफ हे अमेरिकेचे प्रतिष्ठीत उद्योगपती असून ऊर्जा विकास फर्म एनलाइन एनर्जी इंकचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. या दाम्पत्याला नोव्हेंबर २०२२ मध्ये जुळी मुलं झाली आहेत. सरोगसी पद्धतीने प्रीती जय व जिया अशा दोन मुलांची आई झाली आहे. आता हेच जय आणि जिया दोन वर्षाचे झाल्यावर प्रीती पुन्हा हिंदी चित्रपटाकडे परतली आहे. (Lahore 1947)
१७ वर्षानंतर पुनरागमन करणा-या प्रीतीनं दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या लाहोर १९४७ या चित्रपटाची निवड केली आहे. त्यात तिच्या सोबत प्रमुख भुमिकेत सनी देओलही असणार आहे. ९० च्या दशकात पडद्यावर राज्य करणारी ही डिंपल गर्ल त्यासाठी खूप मेहनत घेत आहे. गेल्या काही महिन्यापासून प्रीतीचे जिममध्ये जातानाचे फोटो व्हायरल होत आहेत. तेव्हाच तिच्या या नव्य प्रोजक्टची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर प्रीतीनेच राजकुमार संतोषी यांच्यासोबतचा लाहोर १९४७ चा फोटो शेअर करत आपल्या चित्रपटाची घोषणा केली.
आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनत असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग सध्या हवेलीत सुरू आहे. १२ फेब्रुवारीपासून या चित्रपटाचे शुटींग सुरु झाले आहे. सनी देओल आणि प्रिती झिंटाची जोडीही बऱ्याच काळानंतर पडद्यावर दिसणार म्हणून राजकुमार संतोषी यांनीही आनंद व्यक्त केला आहे. प्रीतीच्या अभिनयाचे त्यांनी कौतुक केले आहे, ती खरोखरच अत्यंत प्रतिभावान आहे, प्रीतीचा अभिनय नैसर्गिक आहे. सनी देओलसोबत प्रीतीची जोडी ऑन-स्क्रीन नेहमीच प्रिय ठरली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, असे राजकुमार संतोषी यांनी सांगितले आहे. शिवाय ‘अंदाज अपना अपना’ या सुपरहिट चित्रपटानंतर आमिर खान आणि राजकुमार संतोषी हे ‘लाहोर १९४७’ या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे सेटवर अतिशय खेळकर वातावरणात शुटींग सुरु असल्याची माहिती आहे. ‘गदर २’ हा सनी देओलचा चित्रपट बॉक्सऑफीसवर सुपरहिट ठरला आहे. त्यामुळे सनी देओलही आणखी एक हिट चित्रपट देण्यासाठी मेहनत घेत आहे.
अर्थातच प्रीती आपल्या या शुटींग शेड्युल मध्ये व्यस्त असली तरी ती अजून एका भूमिकेत आहे, आणि तिथेही तिला वेळ द्यावा लागत आहे. प्रीती आयपीएल टीम पंजाब किंग्जची मालकीण आहे. त्यामुळेच तिच्या संघाची मॅच असेल तेव्हा प्रीती आवर्जून आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये जात आहे.