MPSC च्या स्वप्नांपासून निसर्गरक्षणाच्या लढ्यापर्यंत… ‘आऊट ऑफ सिलॅबस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

मराठी सिनेमांमध्ये वेगळा विषय आणि सामाजिक संदेश घेऊन येणाऱ्या ‘आऊट ऑफ सिलॅबस’ या आगामी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांच्या ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’ प्रस्तुत या चित्रपटातून पुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन आयुष्याचे खरे धडे शिकवणाऱ्या प्रेरणादायी प्रवासाची झलक पाहायला मिळते.

टेंबूरखेड या छोट्याशा गावातील काही तरुणांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा आहे. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या या तरुणांना वाटत असते की, पुस्तकांमध्ये असलेली उत्तरेच आयुष्यातील प्रत्येक प्रश्न सोडवू शकतात. मात्र, नियती त्यांच्यासमोर असा एक गंभीर प्रश्न उभा करते, ज्याकडे समाज आणि व्यवस्थेनेही दुर्लक्ष केलेले असते. हा ‘आऊट ऑफ सिलॅबस’ विषय त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनतो आणि तेथून त्यांच्या संघर्षाला खरी सुरुवात होते. निसर्गसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत हे तरुण जीवनाच्या खऱ्या परीक्षेत स्वतःला कसे सिद्ध करतात, याची प्रेरणादायी आणि थरारक मांडणी या चित्रपटातून करण्यात आली आहे.

या चित्रपटाची निर्मिती डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’ च्या बॅनरखाली केली आहे. लेखक अनिकेत कोरडे यांच्या कथेला दिग्दर्शक नवीन देशबोनिया यांनी प्रभावीपणे पडद्यावर साकारले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सचिन मनोहरराव ढोकणे यांनी ‘एआय क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.

चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी मोहित कुलकर्णी यांनी सांभाळली असून, वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांच्या आवाजाने गीतांना वेगळी उंची मिळाली आहे. मनीष केदार व्यास आणि सुधीर वड्डेली यांनी छायांकन केले असून, संकलनाची धुरा अनिल विठ्ठल थोरात यांनी सांभाळली आहे.

अभिनयाच्या आघाडीवर अजिंक्य राऊत, अद्वयी आणि शेषपाल गणवीर प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्यांच्यासोबत सानिका तोरस्कर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. तरुणाईची स्वप्ने, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश यांचा सुरेख मिलाफ असलेला ‘आऊट ऑफ सिलॅबस’ हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच नव्हे, तर विचार करायला लावणारा आणि सकारात्मक प्रेरणा देणारा अनुभव देईल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.

‘आऊट ऑफ सिलॅबस’ – पुस्तकांच्या पलीकडे… आयुष्याच्या खऱ्या परीक्षेची गोष्ट! हा चित्रपट येत्या ३ जुलै रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Spread the love

Related posts

शशांक शेंडेंचा रहस्यमय लूक व्हायरल; ‘घबाडकुंड’बद्दल वाढली उत्सुकता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’साठी सज्ज

मराठी सिनेमाचा ऑस्करमध्ये डंका! ‘दशावतार’ची 2026 च्या ऑस्करच्या मुख्य शर्यतीत ऐतिहासिक झेप

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More