गोव्याला जाण्याचा प्लॅन प्रत्येक मित्रांच्या ग्रुपमध्ये तयार होतो; पण तो प्रत्यक्षात किती जणांचा पूर्ण होतो, हा वेगळाच विषय. त्या ओळखीच्या भावनेतून सुरू होणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट काही वेळातच साध्या रोड ट्रिपच्या चौकटीबाहेर जातो आणि विनोदासोबत सस्पेन्स व अॅक्शनची जोड देत प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करतो.
कथानकाची सुरुवात सहज वाटते; पण प्रवास जसजसा पुढे सरकतो तसतसे नवे प्रसंग आणि नवी पात्रे कथेला वेगळ्या दिशेने नेतात. चित्रपट मोठे धक्के किंवा ट्विस्ट उघड न करता उत्सुकता कायम ठेवतो. काही ठिकाणी कथा अनेक दिशांना जात असल्याची भावना निर्माण होते, पण पुढे त्यामागील कारण स्पष्ट होत असल्याने चित्रपट पुन्हा पकड घेतो.
दिग्दर्शक विजू माने यांनी केवळ विनोदी प्रसंगांवर भर न देता मराठी सिनेमावरील प्रेमही कथेत मिसळले आहे. अनेक चित्रपट, व्यक्तिरेखा आणि लोकप्रिय संदर्भांचा वापर केवळ ‘फॅन सर्व्हिस’ म्हणून न करता कथानकाचा भाग बनवण्याचा प्रयत्न जाणवतो. त्यामुळे मराठी चित्रपट नियमित पाहणाऱ्या प्रेक्षकांना अनेक प्रसंग अधिक जवळचे वाटतात.
अभिनयाच्या बाबतीत चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे कलाकारांमधील केमिस्ट्री. अंकुश चौधरी पडद्यावर दिसताच चित्रपटाचा टोन बदलतो आणि त्यांच्या व्यक्तिरेखेभोवती अनेक लक्षवेधी प्रसंग उभे राहतात. संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण आणि कुशल बद्रिके यांची मैत्री पडद्यावर नैसर्गिक वाटते. विशेषतः विनोदी प्रसंगांमध्ये त्यांचं टायमिंग अनेकदा हशा मिळवून देतं.
नेहा खान, विदुला चौगुले आणि रुचिरा जाधव यांच्या भूमिका मर्यादित असल्या तरी त्या कथेला आवश्यक तितकी साथ देतात. तर अनेक पाहुण्या कलाकारांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाला वेगळी रंगत येते. या भूमिका केवळ सरप्राईज म्हणून न वाटता कथेला पूरक ठरतात.
तांत्रिक बाजूही चित्रपटाला चांगली साथ देते. गोव्याचं लोकेशन आकर्षक पद्धतीने टिपण्यात आलं आहे. पाठलागाचे प्रसंग, दृश्यरचना आणि पार्श्वसंगीतामुळे चित्रपटाचा वेग टिकून राहतो. संकलन बहुतेक ठिकाणी नेटके आहे, त्यामुळे कथा अनावश्यक रेंगाळत नाही.
चित्रपटातील संवाद हा आणखी एक प्लस पॉइंट आहे. विनोद निर्माण करण्यासाठी संवादांचा प्रभावी वापर करण्यात आला असून, अनेक पंच थिएटरमध्ये सहज हशा मिळवतात. महत्त्वाचं म्हणजे, विनोद करताना अनावश्यक अश्लीलतेचा आधार घेतलेला दिसत नाही.
नक्कीच हा चित्रपट परिपूर्ण नाही. सुरुवातीच्या काही भागात अनेक पात्रांमुळे थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो. काही प्रसंग अधिक संक्षिप्त असते तर अनुभव आणखी परिणामकारक झाला असता. तरीही चित्रपटाचा मनोरंजनाचा ग्राफ बहुतांश वेळ उंचावलेलाच राहतो.
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा केवळ गोवा ट्रिपवर आधारित कॉमेडी नाही; तर मराठी सिनेमाच्या चाहत्यांसाठी अनेक ओळखीच्या आठवणी, विनोद आणि मनोरंजन एकत्र आणणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये बसून हलकाफुलका, मजेशीर आणि संदर्भांनी भरलेला चित्रपट पाहायचा असेल, तर हा पर्याय नक्कीच निराश करत नाही.
सिनेमा : मामाच्या गोव्याला जाऊया (Mamachya Govyala Jauya)
निर्मिती : विजुमानिया, लाइट अँड शेड कंपनी
दिग्दर्शक : विजू माने
कलाकार : अंकुश चौधरी, अभिजित चव्हाण, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, नेहा खान, विदुला चौगुले,रुचिरा जाधव
कथा, पटकथा आणि संवाद : राहुल आवटे, विजू माने, कुशल बद्रिके,
दर्जा : ⭐⭐⭐☆☆ (3/5)
========
हे देखील वाचा : Bhootam Bhayyam Movie Review: हॉररपेक्षा गोंधळ जास्त, कॉमेडीही अपुरी
========