नुकतेच लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे निकाल समोर आले. या निवडणुकीमध्ये भाजपने जरी जास्त जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. यावर्षीची ही लोकसभेची निडवणूक अनेक अर्थाने खास आणि लक्षवेधी ठरली. मनोरंजनविश्वातील अनेक मोठमोठे चेहरे विविध पक्षांमधून निवडणुकीला उभे होते. यातलाच एक अतिशय मोठा आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री कंगना रणौत. बॉलिवूडमधील यशस्वी आणि प्रतिभावान अभिनेत्री म्ह्णून तिची ओळख आहे. अभिनीत यशाच्या शिखरावर असताना कंगनाने मात्र यावेळेस भाजपकडून तिकीट मिळवले आणि निवडणूक लढवली. (Kangana Ranaut)
कंगनाने तिच्या मूळ गावी अर्थात हिमाचल प्रदेशमधील मंडी इथून ही लोकसभा निवडणूक लढवली. सुरुवातीला तिला यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. मात्र तिने याकडे दुर्लक्ष करत आपले काम सुरु ठेवले. तिने तब्बल ७२०७७ मतांनी काँग्रेसच्या विक्रमादित्यसिंह यांचा परावभव केला आणि मोठ्या फरकाने हे यश मिळवले. तिच्यासाठी हा मोठा विजय आहे.
कंगनाने लोकसभा निवडणूक पहिल्यांदाच लढवली आणि जिंकली देखील. तिच्या या विजयानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशामध्ये अनेकांचा वाटा आहे. आज कंगनाला संपूर्ण जग ओळखते. मात्र असे असले तरी यामागे कंगनाची मेहनत अतिशय महत्वाची ठरते. कंगनाची या विजयाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिचा हा प्रवास.
अनेक उत्तमोत्तम सिनेमांमधून प्रभावी भूमिका करणाऱ्या कंगनाचा जन्म २३ मार्च १९८७ हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातल्या भांबला इथे झाला. तिचे संपूर्ण नाव कंगना अमरदीप रणौत. कंगनाच्या घरातून दूरदूर पर्यंत कोणीच अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय नव्हते. मात्र तरीही तिला हे क्षेत्र खुणावू लागले आणि तिने अभिनयात येण्याचे ठरवले. मुख्य म्हणजे तिच्या घरात तिला कोणाकडूनच अभिनयाचा वारसा मिळाला नव्हता, तरी देखील तिला हे क्षेत्र आवडले. एक मात्र होते ते म्हणजे तिला राजकरणाचा वारसा आहे. कंगनाचे पणजोबा सर्जूसिंह हे विधानसभेचे सदस्य होते. सोबतच तिचे आजोबा हे आयएएस अधिकारी होते. कंगनाचे वडील व्यवासायिक आणि आई शिक्षिका आहे. तिच्या वडिलांची इच्छा होती की कंगनाने डॉकटर व्हावे. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.
अतिशय छोट्या शहरात राहणाऱ्या कंगनाला माहित होते की, इथे राहून तिचे अभिनेत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. ती १२ वी नापास झाली आणि पुढे मनोरंजन क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने कंगनाने वयाच्या १६ व्या वर्षी घरातून पळ काढत थेट दिल्ली गाठली. तिथे तिने रंगभूमी दिग्दर्शक असलेल्या अरविंद गौड यांच्या कडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. कंगनाने घरातून पळ काढल्यामुळे तिचे आणि तिच्या कुटुंबाचे संबंध संपले होते.
अभिनयात काम करण्यासाठी तिने खूप संघर्ष केला. अनेक दिवस कोरडी पोळी खाल्ली, मात्र घरातून मदत घेतली नाही. तिच्या संघर्षला यश आले आणि तिला ‘गँगस्टर’ या सिनेमात भूमिका मिळाली. या सिनेमातील तिचा अभिनय सगळ्यांना आवडला आणि तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर देखील तिने थोडा संघर्ष केला. अनेक चित्रपटांमध्ये काम केले मात्र तिला अपेक्षित यश मिळत नव्हते.
पुढे २००८ साली तिला मधुर भांडारकर यांनी ‘फॅशन’साठी कास्ट केले आणि कंगनाच्या करियरला एक वेगळीच दिशा आणि उंची मिळाली. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि तिच्या आयुष्याला गती मिळाली. पुढे तिने तनु वेड्स मनु, क्वीन, कृषी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, कृषि, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका आणि पंगा आदी अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
चित्रपटांमध्ये यशस्वी होताना कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करत बॉलिवूडमधील अनेक गोष्टी आणि सत्य जगासमोर मांडले. अनेक मोठमोठ्या सेलेब्रिटीवर आरोप केले. यासोबतच ती देशातील घटनांवर राजकारण्यांवर देखील स्पष्ट बोलत होती. तिला या तिच्या बिनधास्त आणि बेधडक वागण्यामुळे अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तिचे मुंबईतील घर, ऑफिस देखील पाडण्यात आले. मात्र अनेक संकट येऊन थांबणारी कंगना नाहीच. ती सतत तिचे काम आणि तिची बाजू मांडत राहिली.
कंगनाची मतं आणि बोलणे ऐकून ती भाजपच्या बाजूने बोलते, तिला भाजप पैसे देते, तिची मदत करते, पुरस्कार देते असे अनेक आरोप झाले. मात्र तिने याकडे कानाडोळा केला. कंगनाचा अभिनय क्षेत्रात असूनही इतर अनेक मोठ्या गोष्टींमधला अभ्यास सर्वांसाठीच आश्चर्यकारक होता. पुढे तिने २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपने तिच्यावर टाकलेला विश्वास कंगनाने सार्थ करून दाखवत राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. तिच्या या नवीन वाटचालीसाठी तिला शुभेच्छा…