पुष्कर श्रोत्रींच्या ‘झिम्माड’ पिकनिकमध्ये ६० हून अधिक मराठी कलाकार एकत्र येणार

पुष्कर श्रोत्री यांच्या पुढाकारातून ‘झिम्माड’ पावसाळी पिकनिकमध्ये मराठी कलाकार पुन्हा एकदा मैत्रीचे क्षण अनुभवणार आहेत.

पुष्कर श्रोत्री यांच्या पुढाकारातून मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी ‘झिम्माड’ नावाच्या खास पावसाळी पिकनिकचे आयोजन करण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये पुण्याजवळील मॅरीगोल्ड बॅन्क्वेट्सच्या ‘डी लश’ येथे होणाऱ्या या उपक्रमात ६० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत.

पावसाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात कलाकारांना दैनंदिन धावपळ आणि चित्रीकरणाच्या व्यस्त वेळापत्रकातून काही क्षण निवांत घालवता यावेत, या उद्देशाने या मैत्रीसोहळ्याची आखणी करण्यात आली आहे. नाच-गाणी, विविध खेळ, गप्पा, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि एकत्र घालवलेला निवांत वेळ अशी या सहलीची रूपरेषा असणार आहे.

शाळा-कॉलेजच्या दिवसांतील पावसाळी सहलींच्या आठवणी अनेकांच्या मनात कायम असतात. मात्र व्यावसायिक आयुष्यात अशा भेटी कमी होत चालल्याने मराठी कलाकारांनी पुन्हा एकत्र येण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. पुष्कर श्रोत्री यांच्या आवाहनाला ६० हून अधिक कलाकारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या पिकनिकमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांचा विशेष कृतज्ञता सन्मानही करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, लीला गांधी, अभिनेत्री फैय्याज, अभिनेते मोहन आगाशे, मोहन जोशी तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक राणे यांना कलाकारांच्या वतीने गौरविण्यात येणार आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना पुष्कर श्रोत्री म्हणाले, “पावसाळा हा प्रत्येकाचाच आवडता ऋतू असतो. कामाच्या व्यापातून थोडा वेळ बाजूला ठेवून सगळे कलाकार एकत्र येऊन निवांत गप्पा मारणार, गाणी गाणार, नाचणार आणि भरपूर धमाल करणार आहोत. अशा भेटींमुळे मैत्री अधिक घट्ट होते आणि कामाचा ताणही हलका होतो. या पावसाळी पिकनिकची आम्ही सगळेच आतुरतेने वाट पाहत आहोत.”

सध्या या एकदिवसीय सहलीची तयारी अंतिम टप्प्यात असून सहभागी कलाकारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. दरवर्षी आयोजित होणाऱ्या ‘चिरायु’ हिंदू नववर्ष स्वागत सोहळा आणि रंगकर्मींच्या होळीप्रमाणे ‘झिम्माड’ ही पावसाळी सहलही पुढील काळात वार्षिक परंपरा बनावी, अशी इच्छा पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केली आहे.

मनोरंजन क्षेत्रातील धकाधकीच्या जीवनात कलाकारांना एकमेकांसोबत निवांत वेळ घालवण्याची संधी देणारा हा उपक्रम केवळ सहल न राहता मैत्री, संवाद, कृतज्ञता आणि आपुलकीचा उत्सव ठरणार असल्याचे चित्र आहे.

=======

हे देखील वाचा : अमोल परचुरे यांच्या ‘CatchUp’ने दोन वर्षांत पूर्ण केल्या १०० मुलाखती

============

Spread the love

Related posts

‘घबाडकुंड’च्या यशानंतर प्रीतम एस. के. पाटील ठरले मराठी हॉरर सिनेमाचा नवा चेहरा

Paresh Rawal On OMG 2: ‘अक्षय कुमारमुळे नाही, बदललेल्या स्क्रिप्टमुळे चित्रपट सोडला’; क्रेडिट न मिळाल्याची खंत व्यक्त

Adinath Kothare Divorce: आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर यांचा 15 वर्षांनंतर घटस्फोट

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More