Home » भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा गाजलेला सिनेमा आता ओटीटीवर; एक हृदयस्पर्शी कथा आता घरबसल्या अनुभवता येणार

भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा गाजलेला सिनेमा आता ओटीटीवर; एक हृदयस्पर्शी कथा आता घरबसल्या अनुभवता येणार

शहरातल्या दुर्लक्षित हातांनी जर स्वतःचं नशीब नव्यानं घडवायला सुरुवात केली, तर काय घडेल? हाच प्रश्न उपस्थित करणारा आणि त्याची उत्तरं देणारा सिनेमा — ‘आता थांबायचं नाय’ — आता ZEE 5 या प्रादेशिक भाषांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर 28 जूनपासून पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात मुंबईतील स्वच्छता कामगारांच्या जीवनात डोकावत, त्यांचं वास्तव, त्यांची स्वप्नं आणि संघर्ष फार संवेदनशीलतेनं मांडले आहेत. शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पण कायम पडद्यामागे राहणाऱ्या ‘न पाहिलेल्या’ हिरोंचा गौरव करत हा सिनेमा एका नव्या दृष्टिकोनातून उलगडतो. मराठी भाषेची शान उंचावणाऱ्या या सिनेमाचा डिजिटल प्रीमियर ZEE 5 वर होतो आहे, हे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

दिग्दर्शक शिवराज वायचळ यांच्या या पहिल्याच सिनेमात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेता आशुतोष गोवारीकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. एका सत्यघटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाने थिएटरमध्ये प्रदर्शित होताच समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवला. बॉक्स ऑफिसवर ‘आता थांबायचं नाय’ ने चांगलं यश मिळवलं होतं.

सिनेमात बीएमसीच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची गोष्ट केंद्रस्थानी आहे. शिक्षण अर्धवट राहिलेल्या आणि स्वतःवरचा विश्वास हरवलेल्या या कर्मचाऱ्यांना एका प्रामाणिक व सुधारणावादी अधिकाऱ्याकडून मिळते प्रेरणा. आणि मग सुरू होतो एका वेगळ्या प्रवासाचा आरंभ — वय, समाजाची भीती, आर्थिक अडचणी अशा साऱ्या अडथळ्यांना पार करत ते परत शाळेची पायरी चढू लागतात.

तुकाराम (भरत जाधव) या पात्राच्या माध्यमातून ही कथा उलगडते — एक असा सफाई कर्मचारी, ज्याचं आयुष्य समाजासाठी देऊनही त्याला कधीच ओळख मिळालेली नसते. पण शिक्षणाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणतं — आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि स्वतःचा आवाज मिळवण्यासाठी.

आशुतोष गोवारीकर यांनी साकारलेला अधिकारी त्यांच्यातील सुप्त स्वप्नांना जागं करतो आणि “आपण काही करू शकत नाही” हे आजवर ऐकत आलेले लोक त्या साच्यातून बाहेर पडायला लागतात.

‘आता थांबायचं नाय’ हा सिनेमा फक्त शिक्षणाबद्दल नाही, तो आहे ओळख परत मिळवण्याचा, धाडस एकत्र उभं करण्याचा आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा प्रवास.

जर हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल, तर या 28 जूनला ZEE5 ट्यून करा — कारण आता खरंच, थांबायचं नाय!

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy