मागील अनेक दिवसांपासून लोकसभेच्या निवडणुकांच्या मतमोजणीची प्रत्येक जणं वाट बघत होता. यावर्षी मोदी सरकार हॅट्रिक करणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यासोबतच यावर्षीच्या निवडणुका अधिक खास होत्या. त्याचे कारण म्हणजे अनेक मोठे आणि नामवंत कलाकार यावर्षी निवडणुकीला उभे होते. त्यामुळे रुपेरी पडदा गाजवणारे हे कलाकार राजकारणात देखील आपली छाप पडणार की नाही याकडे देखील अनेकांच्या नजर होत्या.
कायम आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी कंगना रणौत यावर्षी निवडणुकीला उभी राहिली होती. भारतीय जनता पक्षाकडून ती तिचे मूळ गाव असलेल्या हिमाचल प्रदेश राज्यातील मंडी या ठिकाणाहून निवडणूक लढवत होती. या निवडणुकीत कंगनाने दणदणीत विजय मिळवत अनेकांना धक्का दिला आहे. तिने काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला आहे. कंगना रणौतला ५ लाख १४ हजारांहून जास्त मतं मिळाली तर विक्रमादित्य यांना ४ लाख ४२ हजारांहून अधिक मतं मिळाली. याचाच अर्थ कंगनाने तब्बल ७२ हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकांने हा विजय मिळवला.
कंगनाने विजय मिळवताच तिच्या चाहत्यांसोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट करत तिचे अभिनंदन केले आहे. यातच बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभावान अभिनेते अशी ओळख असलेल्या अनुपम खेर यांनी तिचे अभिनंदन करताना सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
अनुपम खेर यांनी कंगनाचा एक फोटो शेअर करत लिहिले. “प्रिय कंगना, मोठ्या बहुमताने विजयी झाल्याबद्दल तुझे खूप अभिनंदन. तू खरंच रॉकस्टार आहेस. तुझा आजवरचा प्रवास सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. मला आज हिमाचल प्रदेश आणि मंडीमधील लोकांसाठी शिवाय तुझ्यासाठी खूपच आनंद झाला आहे. जर आपण लक्ष केंद्रीत करून कठोर कष्ट घेतले तर काहीही होऊ शकत. हे तू नेहमीच सिद्ध केले आहे. जय हो.”
अनुपम खेर यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत कंगनाचे अभिनंदन केले असून, तिला नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सोबतच अनेकांनी भाजपच्या या विजयावर त्यांचे देखील अभिनंदन केले आहे.
या मोठ्या विजयानंतर कंगनाने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. कंगनाने एक पोस्टर शेअर करत लिहिले, “या पाठिंबा, प्रेम आणि विश्वासाबद्दल मंडीतील सर्व जनतेचे मनापासून आभार. हा तुमच्या सगळ्यांचा विजय आहे, हा पंतप्रधान मोदीजी आणि भाजपवरील विश्वासाचा विजय आहे, हा सनातनचा विजय आहे, हा मंडीच्या सन्मानाचा विजय आहे.” कंगनाने शेअर केलेल्या पोस्टवर सगळ्यांनीच शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे.