प्राजक्ता माळी…एक हरहुन्नरी अभिनेत्री, एक उत्कृष्ट सूत्रसंचालक, अप्रतिम नृत्यांगना, कवयित्री, योग अभ्यासक, प्रोड्युसर, यशस्वी बिजनेसवुमन- प्राजक्ताच्या कामांची ओळख करुन द्यावी तितकी कमीच आहे. झी मराठी वाहिनीवर २०१३मध्ये आलेल्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेपासून प्राजक्ता प्रसिद्धीझोतात आली. मेघना आणि आदित्य प्रेक्षकांची लाडकी जोडी होती. मेघनाच्या भूमिकेतून प्राजक्ता घराघरात लोकप्रिय झाली. त्यानंतर प्राजक्ताने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिला एकापेक्षा एक सिनेमांच्या ऑफर्स मिळू लागल्या. प्राजक्ताने ‘हंपी’,‘डोक्याला शॉट’, ‘लकडाऊन बी पॉझीटिव्ह’ सारख्या अनेक सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केले. सोबतच ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीस आली. ‘पांडू’ सिनेमातून नकारात्मक भूमिका साकारत तिने सगळ्यांनाच धक्का दिला. तिच्या या भूमिकेचे कौतुकही झाले. ‘पावनखिंड’, ‘रानबजार’मधल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत असताना ‘चंद्रमुखी’ सारख्या सिनेमातून तिने आपले नृत्य कौशल्य दाखवले. याचवेळी ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून सूत्रसंचालन करत ती सगळ्यांची मनं देखील जिंकत होती. पण प्राजक्ताच्या चाहत्यांना एक खंत होती ती म्हणजे प्राजक्ता पुन्हा मालिकेत दिसली नाही. २०१७मध्ये प्राजक्ताने ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ ही मालिका केली होती. या मालिकेने नोव्हेंबर २०१७मध्ये सगळ्यांचा निरोप घेतला होता. तर प्राजक्ताच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
आता प्राजक्ता तब्बल सहा वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर मालिकेत कमबॅक करत आहे. तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. सोनी मराठीवरील ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेत ती दिसणार आहे. मालिकेत ती पूजा गायकवाड या भूमिकेत दिसेल. प्राजक्ताचा मालिकेतला प्रोमो समोर आला असून तो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. दिसायला गोड, स्वभावाने कडक,पण बेधडक अशी पूजा आता पारगाव पोस्ट ऑफीसमध्ये येणार आहे. पारगाव पोस्टात संगणक आल्यामुळे आधीच सर्वांच्या कामात गोंधळ उडाला आहे. पण आता पोस्टात प्राजक्ताच्या येण्यामुळे काय धमाल होणार आहे, हे पाहणे रंगतदार ठरेल. प्राजक्ताला मालिकेत पाहण्याची संधी मिळत असल्याने तिचा चाहतावर्ग नक्कीच खूश होणार आहे. या मालिकेत समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, प्रभाकर मोरे, इशा डे,वनिता खरात,प्रियदर्शनी, दत्तू मोरे हे कलाकार आहेत. अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी या मालिकेतून छोट्या पडद्यावर तब्बल १७ वर्षांनंतर कमबॅक केले होते. या मालिकेतल्या कुलकर्णी, गुळस्कर, निरगुडकर अशा काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
तर मग ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे.’ ही मालिका सोनी मराठीवर गुरुवार ते शनिवार रात्री 9 वा. पहायला विसरु नका. सोबतच आमचा हा लेख आवडला असेल तर लाईक करा.