संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. अतिशय मोठा आणि धक्कादायक निकाल समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. भाजपाला जरी जास्त जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. तर दुसरीकडे काँग्रेस इंडिया या युतीने भाजपला जोरदार टक्कर दिली.
या निवडणुकीमध्ये भाजपने अनेक नामी चेहऱ्यांना संधी दिली होती. यात कंगना राणोत, अरुण गोविल, हेमा मालिनी आदींसोबतच केंद्रीय मंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांचा देखील समावेश होता. मात्र दुर्दैवाने त्यांना ही निवडणूक जिंकता आली नाही. स्मृती इराणी या मनोरंजनविश्वातील किंबहुना टेलिव्हिजन जगातील अतिशय मोठ्या आणि लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अभिनयात काम करत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
स्मृती इराणी यांनी ‘तुलसी’ बनून अमाप लोकप्रियता मिळवली. संपूर्ण जगात त्यांच्या ‘क्यों की सांस भी कभी बहु थी’ या मालिकेने लोकप्रियतेचे रेकॉर्ड बनवले. आजही अनेक ठिकाणी त्यांना ‘तुलसी’ या नावानेच ओळखले जाते. असे असूनही त्यांना त्यांच्या या लोकप्रियतेचा निवडणुकीमध्ये उपयोग झाला नाही आणि त्या पराजित झाल्या. सुरुवातीपासूनच स्मृती इराणी विविध पादनावर काम केले. मोदी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून देखील काम पाहिले किंबहुना पाहत आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश मधील अमेठी मध्ये अतिशय उत्तम कामं केली. लोकांमध्ये जाणून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर कामं केली. असे असूनही त्यांचा झालेला हा पराजय त्यांना आणि त्यांच्या चाहत्यांना चांगलाच जिव्हारी लागला.
स्मृती यांचा जन्म २३ मार्च १९७६ रोजी दिल्लीमध्ये झाला. त्यांनी 12 वी पर्यंतचे शिक्षण दिल्लीच्या होली चाईल्ड ऑक्जीलियम स्कूलमधून घेतले तर स्कूल ऑफ ओपन लर्निंग दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या स्मृती यांनी घरात आर्थिक मदत करण्याच्या हेतूने काही काळ हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणूनही काम केले. याच काळात त्यांना कोणीतरी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. या क्षेत्रात कामं मिळवण्यासाठी स्मृती यांनी दिल्लीहून मुंबई गाठली. मुंबईमध्ये त्यांनी 1998 मध्ये मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारत स्वतःचे स्थान कायम केले.
मात्र त्यांना ती स्पर्धा जिंकता आली नाही. १९९८ साली मिका सिंगच्या ‘सावन में लग गई आग’ या अल्बममधील ‘बोलियान’ गाण्यात त्यांनी परफॉर्म केले. पुढे काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांना एकता कपूरची ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका मिळाली. या शोमुळे त्या देशातील नव्हे तर विदेशातील घराघरात पोहोचल्या. स्मृती इराणी यांच्या प्रभावी अभिनयामुळे ही मालिका प्रचंड लोकप्रिय आणि अनेक वर्ष गाजली. त्या मालिकेनंतर स्मृती इराणी यांनी ‘विरुद्ध’, ‘तीन बहुरानी’ आणि ‘एक थी नायिका’ यांसारख्या अनेक मालिकांमध्येही काम केले.
दरम्यानच्या काळात स्मृती इराणी यांनी 2003 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २००४ साली त्यांना महाराष्ट्राच्या ‘युथ विंग’च्या उपाध्यक्ष बनवण्यात आले. तर 2010 मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि महिला विंगच्या अध्यक्षा झाल्या. अभिनय आणि राजकारण त्या उत्तम पद्धतीने पार पाडत होत्या. पुढे 2014 मध्ये उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघातून त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्या पराभूत झाल्या. पुढे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि यावेळी त्यांनी राहुल यांना हरवत विजय मिळवला.
आज स्मृती इराणी हरल्या असल्या तरी त्या त्यांचे काम अगदी प्रामाणिकपणे आणि सेवाभावाने पार पडताना दिसतात.