महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा लाभली आहे. या संत परंपरेवर आधारित सोनी मराठी वाहिनीवर (Sony Marathi) मालिका ‘ज्ञानेश्वर माउली’ ( Dnyaneshwar Mauli ) या मालिकेतून प्रेक्षक एका अलौकीक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. माउली आणि त्यांची भावंडं, त्यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान या गोष्टी आपण बालपणापासून ऐकत आलो आहोत, पुस्तकांतून वाचत आलो आहोत. माऊलींचा हा प्रवास लेखक,निर्माता चिन्मय मांडलेकर आणि दिग्पाल लांजेकरने छोट्या पडद्यावर साकारला आणि प्रेक्षक या भक्तिरसात तल्लीन झाले. या मालिकेने नुकताच ५०० एपिसोडचा टप्पा पार केला.
नक्कीवाचा: ‘नवे लक्ष्य’ मालिकेतील अभिनेत्री शुभांगी सदावर्तेचे सिनेमात पदार्पण
या निमित्ताने मालिकेत सोपानदेव यांची भूमिका साकारणारा अभिनेता नितीन वाघ (Nitin Wagh) याने लिहलेली पोस्ट ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका साकारणारा अभिनेता वरुण भागवत (Varun Bhagwat) याने शेअर केली आहे. ही पोस्ट लिहताना नितीन भावूक झालेला दिसत आहे. नितीनने ज्ञानेश्वर माऊली या मालिकेच्या सेटवरचे कुटूंबाचे फोटो शेअर केले आहेत. आणि कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘’आज माऊलींच्या कृपेने ‘ज्ञानेश्वर माऊली’ या आमच्या मालिकेचा ५०० वा भाग प्रसारित झालाय. काही महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाला ‘सर्वोत्कृष्ट कुटुंब’ असं पारितोषिक मिळालं. पण हे पारितोषिक आम्हा कलावंतांचं नसून खऱ्याखुऱ्या भावंडांचं आहे. सातशे वर्षांहूनही अधिक काळापासून साऱ्या मराठी मनात खोलवर रुजलेलं हे कुटुंब. एखादा प्रोजेक्ट आपल्याला काय देतो? समाधान? पैसा?ओळख? नवे मित्र? नव्या ओळखी? आत्मविश्वास? सतत नवीन शिकण्याची लालसा? की सगळंच देतो. हो. हे जवळपास सगळं मला ‘माऊली’ने दिले आहे.अभिनेता म्हणून काही सीन्स आपल्या वाटेला येतात, जे आपल्या स्मरणात चिरकाल राहतात. त्यातलाच एक सीन म्हणजे सोपान ज्ञानेश्वरांना ‘माऊली’ म्हणून संबोधतो. इतका सुंदर सीन माझ्या वाटेला दिला म्हणून मुद्दामच इथे चिन्मय मांडलेकर दादाचा उल्लेख करणं आवश्यक आहे. तो सीनही तितक्याच कलात्मकरित्या विक्रमने बसवून शूट केला होता. हीच गोष्ट ज्यावेळी भोजलिंग काका समाधी घेतात, त्यावेळची. त्यावेळी सलग साडे पंचवीस तास काम करून आम्ही सारेच थकलो होतो. पण ज्यावेळी काकांचे प्राण पंचतत्वात विलीन व्हायची वेळ येते, त्यावेळी माझ्या भावनांचा बांध सुटला आणि माझे हुंदके थांबेनासे झाले होते. त्यातून बाहेर पडायला मला बराच वेळ लागला होता. पण तो सीनही केल्यानंतर मला अतीव समाधान मिळालं होतं. अर्थातच याचं श्रेय जातं ते तुषारला. सुंदर संवाद त्याने माझ्या वाट्याला दिले. मर्यादित भागांची मालिका ते ५०० भागांचा टप्पा हे प्रेक्षकांच्या प्रेमाचं द्योतक आहे. कोणत्याही कलाकृतिला जेव्हा प्रेक्षक डोक्यावर घेतात, तेव्हा ती कलाकृती त्यांच्या मनात घर करून आहे, असा त्याचा अर्थ असतो. हे प्रेम मायबाप प्रेक्षक असंच वर्षवत राहो, हीच माऊलींचरणी प्रार्थना.’
ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. आता माउलींच्या कार्यात ग्रामजोशी पुन्हा अडथळा निर्माण करताना दिसणार आहेत. त्यांना माउली आणि त्यांची भावंडं कसे सामोरे जाणार, हे पाहायला मिळणार आहे. हा अलौकिक प्रवास पाहण्यासाठी ‘ज्ञानेश्वर माउली’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर सोमवार-शनिवार संध्या 7 वा., नक्की पहा.