‘War 2’ ही दोन योद्ध्यांच्या लढाईची गोष्ट आहे. कबीर (हृतिक रोशन) हा माजी रॉ एजंट, जो आता भाडोत्री मारेकरी आहे. १५ महिन्यात २० हत्या करून तो “The man who doesn’t miss” म्हणून ओळखला जातो. तो जरी फ्रीलान्सर असल्याचा दावा करत असला, तरी ‘काली’ नावाच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने त्याला कामावर घेतलेले असते. पण कबीरचा खरा हेतू ‘काली’चा अंत करणे हा असतो.
दरम्यान, विंग कमांडर काव्या (कियारा अडवाणी) एका यशस्वी मोहिमेसाठी सन्मानित होत असते. समारंभात तिच्या वडिलांना (अशुतोष राणा) आलेला फोन हा कालीने लावलेला सापळा असतो. कबीरला त्यांची हत्या करण्याचा आदेश दिला जातो… आणि तो ती पूर्ण करतो! त्यानंतर नवीन वॉर चीफ म्हणून अनिल कपूर पदभार स्वीकारतात आणि विक्रम (ज्युनिअर एनटीआर) नावाच्या ऑफिसरला संघात सामील करतात.
कबीर आणि विक्रम यांच्यात विमान, रेल्वे, कार अशा अनेक ठिकाणी अॅक्शन सिक्वेन्सेस रंगतात. शेवटी कबीर विक्रमला सत्य सांगतो आणि दोघे मिळून ‘काली’च्या पुढील मिशनला थोपवण्यासाठी निघतात. पण विक्रम खरंच कबीरचा साथी आहे का? काव्याला सत्य कळेल का? आणि कबीर शत्रूची जर्सी घालूनही देशासाठी खेळू शकेल का? हे जाणण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.
कलाकारांची कामगिरी
हृतिक रोशन — कबीर म्हणून हृतिकची एन्ट्रीच सिनेमाला एक वेगळा रंग देते. मसल्स, तलवारबाजी, डायलॉग डिलिव्हरी आणि ‘जनाब-ए-अली’ वरचा त्याचा डान्स — सगळंच परफेक्ट. ज्युनिअर एनटीआर — त्याची पहिली बॉलिवूड फिल्म आणि त्याने ती आपल्या शैलीने गाजवली. “जो तूने गुलाम बनके किया, मैं आज़ाद रहके किया” सारखे डायलॉग्स प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. कियारा अडवाणी — केवळ ग्लॅमर डॉल न राहता ती कथेत महत्त्वाची भूमिका बजावते. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिची झुंज प्रभावी. आशुतोष राणा व अनिल कपूर — अपेक्षेप्रमाणे ठसा उमटवतात.
अयान मुखर्जीने अॅक्शन, थ्रिल, डायलॉग्स आणि डान्स यांचा मसाला योग्य प्रमाणात मिक्स करून चित्रपट सादर केला आहे. स्पाय युनिव्हर्समध्ये महिलांना फक्त साइड रोल देण्याची परंपरा तोडण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. मात्र दुसऱ्या अर्ध्यात गती थोडी मंदावते, फ्लॅशबॅक सीन लांबट वाटतात.
‘War 2’ हा अॅक्शन आणि थ्रिलर चाहत्यांसाठी नक्कीच एकदा पाहण्यासारखा चित्रपट आहे. हृतिक रोशनने प्रत्येक फ्रेममध्ये आपली कमाल दाखवली असून ज्युनिअर एनटीआरनेही प्रभावी बॉलिवूड पदार्पण केले आहे. पहिला अर्धा रंगतदार, दुसऱ्यात थोडी गती कमी — पण एकूणात स्टायलिश, एंटरटेनिंग आणि भरपूर पंचेस असलेला मसाला पॅकेज.
सिनेमा : वॉर २ (War 2)
निर्माते : आदित्य चोप्रा
दिग्दर्शक : अयान मुखर्जी
कथा : आदित्य चोप्रा
कलाकार : हृतिक रोशन, ज्युनिअर एनटीआर, कियारा अडवाणी, आशुतोष राणा, अनिल कपूर
दर्जा : तीन स्टार