आई–मुलींच्या नात्यातील न बोललेल्या भावना उलगडणारा ‘तिघी’चा भावस्पर्शी टीझर प्रदर्शित

आई आणि मुलींचं नातं हे केवळ रक्ताचं नसतं, तर अनुभव, आठवणी, संस्कार आणि अनेकदा न बोललेल्या भावनांनी ते विणलेलं असतं. कधी अतूट जिव्हाळ्याचं, तर कधी अपेक्षा आणि गैरसमजांमुळे निर्माण झालेल्या अंतराचं… तरीही अंतर्मनाने कायम एकमेकांशी घट्ट जोडलेलं. या नात्याच्या अशाच नाजूक, हळुवार आणि खोल छटा उलगडणारा ‘तिघी’ हा आगामी मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचा भावस्पर्शी टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनाला अलगद हात घातला आहे.

अवघ्या काही क्षणांच्या या टीझरमधून एका घरातल्या तीन स्त्रियांचं भावविश्व प्रभावीपणे उलगडतं. आई आणि तिच्या दोन मुलींमधील दुरावा, न व्यक्त झालेल्या भावना, मनात साठलेल्या आठवणी आणि त्या सगळ्याच्या पलीकडे असलेलं प्रेम—हे सगळं अतिशय वास्तवदर्शी पद्धतीने समोर येतं. कोणताही भडकपणा न करता, शांततेतून उलगडणाऱ्या भावनांचा हा प्रवास प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो.

‘आईचं घर. हजार आठवणी.’ ही चित्रपटाची टॅगलाईनच त्याचा आत्मा सांगून जाते. आठवणींनी भरलेलं घर आणि त्या घरातल्या ‘तिघीं’चं अंतर्मन हा या कथेचा केंद्रबिंदू आहे. घर हे केवळ चार भिंती नसून, तिथे साठलेल्या आठवणी, न बोललेले संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या भावना यांचं प्रतिबिंब ठरतं, हे ‘तिघी’ प्रभावीपणे मांडतो.

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात,
“आई आणि मुलीचं नातं अनेकदा शब्दांपलीकडचं असतं. प्रेम व्यक्त होत नाही, ते जाणवतं. वेदना बोलल्या जात नाहीत, त्या समजल्या जातात. ‘तिघी’मधून आम्ही अशाच न बोललेल्या संवादांचा आणि न दिसणाऱ्या भावनांचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट प्रत्येक स्त्रीच्या मनातल्या एका कोपऱ्याला नक्कीच स्पर्श करेल.”

या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून, सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले आहे. निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आई–मुलींच्या नात्याकडे प्रगल्भ आणि संवेदनशील नजरेतून पाहणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

=====

हे देखील वाचा : २४व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’मध्ये ‘तिघी’ची अधिकृत निवड

=====

Spread the love

Related posts

‘शतक’च्या माध्यमातून संघ समाजापर्यंत पोहोचेल – डॉ. मनमोहनजी वैद्य | ‘शतक : संघ के १०० वर्ष’ ट्रेलर लाँच

विद्यार्थ्यांवर आधारित ‘बंटी बंडलबाज’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारी अभिनित ‘एक दोन तीन चार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More