गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि पुन्हा चर्चेला नव्या फाटा फुटल्या. काय सत्य असत्या.. हे बरोबर की ते चुकीचं? ही सिनेलिबर्टी की वास्तव? या सगळ्या अग्निदिव्यातून सिनेमा जात असताना; सिनेमाला सिनेमासारखं पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. सिनेमा हा ‘सॉफ्ट पॉवर’चा एक भाग असतो; परंतु सिनेमांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन खरंच गोळी दागता येते का? तर त्याच उत्तर प्रत्येक प्रेक्षकांम स्वतः शोधायचे आहे. आपल्या बुद्धीला पटेल, समजेल, उमजेल त्यावर आपण विश्वास ठेवायचा आणि बाकी मनोरंजन म्हणून मागे सोडून द्यायचं. हा सर्व डिस्क्लेमर मुद्दाम अगोदरच दिला; जेणेकरून ‘द केरळ स्टोरी‘कडे आपण सिनेमा म्हणून पाहू आणि हा जर त्या कथानकातील दहा टक्के जरी वास्तव असेल तर ते देखील भीषण आहे.
जगाच्या पाठीवर आणि जागतिक राजकारणात काय सुरु आहे? किंवा माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो? याचं उत्तर देणारा हा सिनेमा. सुदीप्तो सेन आणि विपुल शाह यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून अशी कथा प्रेक्षकांसमोर आणली आहे, जी पाहून अंगावर काटा आल्या शिवाय राहणार नाही. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि आय आयसिस (ISIS) चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. पण, इतकाच काय तो सिनेमा नव्हे.. पटकथेतील बारकावे आणि विविध दृश्य स्वतःमध्ये एक एक गंभीर उपकथानकाचा भाग किंबहुना प्रारंभ आहे.
विशेष म्हणजे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी आपल्या देशातील सर्वांत साक्षर मानल्या जाणाऱ्या राज्यातील भयानक वास्तव अत्यंत चतुराईने पडद्यावर मांडली आहे. कशा पद्धतीने सर्व धर्माच्या निर्दोष महिलांना कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तर कधी धमकीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जातं, याचं चित्रण मनाला अस्वस्थ आणि अस्थिर करणारं आहे. सोबतच सद् आणि असद् विवेकबुद्धीची दुहेरी बाजू सिनेमात आपल्या समजून घेता येते. यासाठी लेखक दिग्दर्शक कौतुक करायला हवं. सुदीप्तो यांनी दिग्दर्शक म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. यातील संवादसुद्धा अत्यंत विचारपूर्वक पद्धतीनं लिहिण्यात आले आहेत. (The Kerala Story)
कथेची सुरुवात फातिमा उर्फ शालिनी उन्नीकृष्णन (अदा शर्मा) हिच्या कडून होते. अधिकाऱ्यांकडे ती तिच्या भयंकर आणि वेदनादायक भूतकाळाचे कथन करत असते, ‘मी आयसीस (ISIS) मध्ये कधी सामील झाले हे जाणून घेण्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की.. मी अशी आणि का सामील झाले?’ कट टू.. फ्लॅश बॅक… जिथे चार विद्यार्थिनी केरळमधील कासरगोड येथील नर्सिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. शालिनी तिच्या रूममेट्स गीतांजली (सिद्धी इदनानी), निमा (योगिता बिहानी) आणि असिफा (सोनिया बालानी) यांच्यासोबत एकत्र एक खोली शेअर करते. काळानुरूप त्या जवळच्या मैत्रिणी बनतात. शालिनी, गीतांजली आणि निमाला यांना असिफाच्या एका वाईट हेतूंबद्दल पूर्णपणे नामानिराळ्या असतात.
वास्तविक असिफाचा एक छुपा अजेंडा आहे की, तिच्या रूममेट्सना त्यांच्या कुटुंबापासून आणि धर्मापासून दूर नेऊन इस्लाममध्ये बदलण्याचा. यासाठी ती तिच्या दोन खोट्या भावांचा आधार घेते आणि असा सापळा रचते की मुली कट्टरपंथी बनतात. त्यांचे ब्रेनवॉश करण्यासाठी त्यांना ड्रग्ज दिले जाते, कुटुंबाबद्दल द्वेष आणि धर्मावर अविश्वास निर्माण केला जातो. इतकेच नाही तर शालिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा रमीझ तिला गरोदर बनवतो. समाजाच्या भीतीमुळे शालिनी इस्लामचा स्वीकार करते, अज्ञात व्यक्तीशी लग्न करते आणि भारत सोडून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमार्गे सीरियाला पळून जाते. पुढचा प्रवास नेमका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी नक्कीच सिनेमा पाहायला हवा. (The Kerala Story Review)
दिग्दर्शक म्हणून सुदीप्तो सेनने सिनेमाच्या पडद्यावर केलेल्या वातावरण निर्मितीतून प्रेक्षकांच्या मनात भीती आणि अस्वस्थता निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. परंतु, दिग्दर्शकाने सिनेमातील पात्रांचे लिखाण करताना अधिक बारकाईनं काम करणं आवश्यक होतं. कारण, अनेक प्रसंगांमध्ये कलाकारांचा अभिनिवेश खोटा आणि अवास्तविक वाटतो. तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादाच्या खाईत बुडवणे हा अतिशय गंभीर विषय आहे, पण चित्रपटातील त्याचे प्रक्षेपण काही अंशी चुकीचे वाटते. चित्रपटातील मुलींचे ब्रेनवॉश करण्याची प्रक्रिया खूपच बालिश दिसते. आसिफा आणि तिचे साथीदार ज्या प्रकारे पदवीधर मुलींना फसवतात ते त्यांना पटण्यासारखे वाटत नाही. हॉस्पिटलमध्ये पडलेल्या वडिलांवर गीतांजली थुंकते, शालिनी कोलंबोमध्ये सत्य माहीत असूनही सीरियाला जाते, अशी अनेक दृश्ये आहेत; तर्कशून्य भासतात.
चित्रपटातील हिंसक आणि बलात्काराची दृश्ये दुर्बल मनाच्या लोकांसाठी मुळीच नाहीत. विविध समाज आणि विचारसरणीच्या लोकांच्या भावना दुखावणारे असे अनेक संवादही सिनेमात आहेत. पण, त्याकडे वैचारिक दृष्टीने पाहिल्यास त्यातील मर्म समजून घेता येईल. चित्रपटाचं एडिटिंग पटकथेच्या वेगानं सैल आहे. प्रशांतनु महापात्रा यांच्या सिनेमॅटोग्राफीमध्ये केरळपासून अफगाणिस्तानपर्यंतचे जग अतिशय चांगल्या पद्धतीने पडद्यावर दाखवलं आहे.
अभिनयाच्या बाबतीत, अदा शर्माने एकीकडे शालिनीच्या रूपात तिची निरागसता आणि दुसरीकडे फातिमाच्या रूपात भीती, असहायता, राग आणि वेदना यांचं चित्रण केलंउत्कृष्टपणे केलं आहे. चित्रपटातील अदाचे काम कौतुकास्पद आहे. चित्रपटात तिने दाक्षिणात्य भाषेचा लहेजासुद्धा योग्य पद्धतीने वापरला आहे. अदासोबतच योगिता आणि सोनिया यांच्याही भूमिका ठळक लक्षात राहतात. मैत्रिणी म्हणून योगिता बिहानी आणि सिद्धी इदनानी यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे, पण त्यांच्या पात्रांमध्ये खोली जाणवत नाही. विरेश आणि बिसाख ज्योतीने खूप चांगल्या प्रकारे या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. सिनेमाचं कथानक पुढे जाण्यासाठी ही गाणी फायदेशीर ठरतात. या गाण्याचे बोल प्रेक्षकांना भावतात.
हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असा दावा निर्माते-दिग्दर्शकांनी केला आहे. या कथेत त्यांनी असे काही पुरावे दिले आहेत, जे पाहून तुम्ही स्वत: आश्चर्यचकीत व्हाल. चित्रपटाची कथा अंगावर काटा आणणारी आणि तितकीच प्रभावशाली आहे. पण, हे वास्तव की अवास्तव.. याचा निर्णय आणि स्वीकार प्रत्येकाने स्वतःच्या बुद्धीच्या कुवतीनुसार करायचा आहे.
दिग्दर्शक : सुदीप्तो सेन
कलाकार : अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी, सिद्धि ईरानी, प्रणय पचौरी, प्रणव मिश्रा
दर्जा : साडेतीन