मराठी चित्रपटसृष्टीत एका भव्य मल्टीस्टारर सिनेमाची आतुरता लवकरच संपणार आहे. ‘थप्पा’ नावाचा हा हटके चित्रपट हिंदी मल्टीस्टारर सिनेमांनाही टक्कर देईल, असा विश्वास वाटतो. दमदार कथानक, तगडी स्टारकास्ट आणि बिग बजेट या सगळ्यांची सांगड घालून हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिग्दर्शक सिड विंचूरकर यांच्या दिग्दर्शनाखाली याचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.
‘थप्पा’ची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची ड्रीम कास्टिंग.
वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ बोडके, गौरव मोरे, डॅनी पंडित, सखी गोखले आणि साईंकित कामत हे सात लोकप्रिय कलाकार पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. प्रेक्षकांना या नव्या जोडीदारांच्या केमिस्ट्रीसह एक ताजा आणि थरारक अनुभव मिळणार आहे.
निर्मितीची धुरा स्टुडिओ लक्स आणि फिफ्टी टू फ्रायडे यांनी एकत्र सांभाळली असून, मेहुल शाह आणि अमित भानुशाली हे निर्माते आहेत. याआधी ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘गर्ल्स’, ‘स्माईल प्लीज’ यांसारखे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांसमोर आणलेल्या या बॅनरकडून ‘थप्पा’साठीही मोठ्या अपेक्षा आहेत.
कथा नेमकी कशावर आधारलेली आहे – मैत्री, प्रेमकथा, सूड की एखादं गूढ रहस्य? याबद्दल अद्याप गुप्तता पाळली जात असल्याने प्रेक्षकांचे कुतूहल आणखी वाढले आहे.
दिग्दर्शक सिड विंचूरकर म्हणतात,
“सध्या अनेक गोष्टी गुप्त आहेत, पण इतक्या दमदार स्टारकास्टसह ‘थप्पा’ प्रेक्षकांवर भव्य ठसा उमटवेल याची खात्री आहे. संपूर्ण टीम खूप उत्साहित असून, प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि प्रभावी घेऊन येतोय.”